वसई-विरार महापालिका आरक्षण जाहीर

वसई-विरार महापालिका आरक्षण जाहीर

महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, माजी महापौर यांच्यासह काही सभापतींसह अनेक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर कित्येकांना दिलासाही मिळाला आहे. वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत शुक्रवारी दुपारी काढण्यात आली. आरक्षणानंतर फटका बसलेले नगरसेवक नाराज होते, तर जागा वाचलेल्या नगरसेवकांचा आनंद चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता.

महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत 115 प्रभाग होते. या प्रभागांची संख्या आणि रचना कायम ठेवण्यात आली असून, लवकरच त्यासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी दुपारी प्रभागांवर आरक्षण टाकण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पार पाडली. या आरक्षणासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यामुळे विरारचा पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हॉल गर्दीने भरला होता.
115 प्रभागांपैकी 12 प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी, 36 प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी, 15 प्रभाग मागास प्रवर्गातील महिलांसाठी, 4 प्रभाग नागारिकांच्या मागास पुरुष प्रवर्गासाठी, 3 प्रभाग अनुसुचित जातीतील महिलांसाठी, 3 प्रभाग अनुसुचित जमातीतील महिलांसाठी, 2 प्रभाग अनुसुचित जातीतील पुरुषांसाठी आणि 2 प्रभाग अनुसुचित जमातीतील पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच 38 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे.

महापौर, माजी महापौर, सभापती, नगरसेवक यांच्यासह अनेक नगरसेवकांचे सध्याचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. महापौर प्रवीण शेट्टी यांचा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे. तर उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, सभापती भरत मकवाना, सभापती अतुल साळुंखे, सभापती सखाराम महाडिक, सभागृह नेते फ्रॅन्क आपटे, आरोग्य सभापती राजु कांबळी, माजी महापौर रुपेश जाधव, नगरसेवक दिलीप गोवारी, सभापती यज्ञेश्वर पाटील, रणजीत पाटील, विनय पाटील, महेश पाटील, सुदेश चौधरी, पंकज चोरघे, मार्शल लोपीस, अजीत नाईक, किशोर नाना पाटील, प्रकाश चौधरी, मिलिंद घरत, किसन बंडागळे, अरुण जाधव, राजेश ढगे, समीर डबरे वृंदेश पाटील, चंद्रकांत गोरिवले, स्वप्नील बांदेकर, सिताराम गुप्ता, प्रफुल्ल पाटील, सचिन घरत, कल्पेश मानकर, मनीष वर्तक, लॉरेल डायस यांच्या प्रभागावरही महिलांचे आरक्षण पडले आहे. माजी सभापती भारती देशमुख, अ‍ॅड. अंजली पाटील आणि शोभा मोरे यांचे प्रभाग त्यांच्यासाठी सुरक्षित राहिले आहेत.

प्रभाग आरक्षणावर येत्या 2 ते 9 मार्चपर्यंत हरकती घेण्यात येणार आहेत. 12 मार्चला अंतिम आरक्षणासह प्रभाग रचना राज्य निवडणुक आयोगाकडे पाठण्यात येईल, अशी माहिती डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिली.

First Published on: February 29, 2020 2:44 AM
Exit mobile version