एस.व्ही,रोडसह न्यू लिंकरोडवर पार्किंग कारवाईचा बोजवारा

एस.व्ही,रोडसह न्यू लिंकरोडवर पार्किंग कारवाईचा बोजवारा

पश्चिम उपनगरातील के/पश्चिम प्रभागाच्या हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग आणि न्यू लिंक रोडचा परिसर पार्किंगमुक्त जाहीर करण्यात आला असला तरीही याठिकाणी खासगी तसेच कमर्शियल वाहनांवर कारवाई करण्यात महापालिकेला अपयश येत आहे. न्यू लिंक रोड आणि एस.व्ही.रोडवरील बस स्थानकावर रिक्षा व टॅक्सीसह टेम्पो सर्रासपणे उभ्या केल्या जात आहे.

स्वामी विवेकानंद मार्गावर जुहू एअरपोर्ट ते ओशिवरा नदीपर्यंतचा ६ कि.मी अंतरापर्यंत तर न्यू लिंक रोडवर डि.एन.नगर मेट्ो स्टेशन ते ओशिवरा नदीपर्यंतच्या २ कि.मी अंतरावर महापालिकेच्यावतीने पार्किंगमुक्त घोषित करण्यात आले. परंतु मागील ३० ऑगस्टपासून या रस्त्यांवर वाहने उभी केल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यानंतर, आजही त्यात महापालिकेला यश मिळालेले नाही.

एस.व्ही. रोडवर अंधेरी रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानकाला चक्क रिक्षांचा विळखा पडलेला आहे, तर आंबोली नाका येथील बस स्थानकावरच दुचाकीसह टेम्पो उभे करण्यात आले आहे. तर फारुख विद्यालयाजवळील बस स्थानकावरच रिक्षांचे गॅरेज तयार करण्यात आले आहे. न्यू लिंक रोडवर सध्या मेट्ो रेल्वेचे काम सुरु आहे. यामुळे वाहतुकीची आधीच कोंडी होत आहे. ज्ञानसागर विद्यालयासमोर मेट्ो रेल्वेच्या कामांसाठीच लोखंडी खांब उभारण्यात आला आहे. त्याच्या आड रिक्षा उभ्या केल्या जात आहेत.

तर लोखंडवाला लिंक रोडवर इन्फीनिटी मॉलसमोरील बस स्थानकाला फेरीवाल्यांनी विळखा घातलेला असून त्याठिकाणी खासगी वाहनेही उभी केली जाते.त्यामुळे बसला मुख्य रस्त्यावरच थांबा द्यावा लागतो. याशिवाय लक्ष्मी औद्योगिक वसाहत बस थांब्यावरच रिक्षा उभ्या करून शेअरींगचा धंदा केला जात आहे. तर इंडियन ऑईलनगर येथे ऑडी मुंबई वेस्ट या गाड्यांच्या शोरुमची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहे. बसस्थानकालाच खेटूनही ही वाहने उभी असताना महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची कडक कारवाई केली जात नाही.

के/पश्चिम परिसरातील सार्वजनिक वाहनतळ आणि एस.व्ही.रोड व न्यू लिंक रोडवर आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये २४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यापैकी रस्त्यांवरील वाहनांच्या कारवाईत आतापर्यंत ८८ वाहने जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ७ लाख ७५ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून सर्व वाहनांवरील कारवाईत २७ लाख ०५ हजार रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे. या विभागाचा पदभार आपण काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. परंतु यापुढे ही कारवाई सध्याच्या तुलनेतही अधिक तीव्र केली जाईल.
-विश्वास मोटे, सहायक आयुक्त, के/पश्चिम विभाग

याठिकाणी दिसून येतात वाहने
एस.व्ही.रोड :
अंधेरी रेल्वे स्थानक
आंबोली नाका बस स्थानक
फारुख विद्यालय
जोगेश्वरी बस स्थानक
जोगेश्वरी टेलिफोन एक्सेंज(आक्सा मस्जिद रोड)

न्यू लिंक रोड :
ज्ञानसागर विद्यालय
लोखंडवाला लिंक रोड
लक्ष्मी औद्योगिक वसाहत
इंडियन ऑईल नगर

First Published on: September 27, 2019 5:28 AM
Exit mobile version