लोकमान्य टिळक रुग्णालयाचे उपाधिष्टाता डॉ. राकेशकुमार वर्मा यांना अटक

लोकमान्य टिळक रुग्णालयाचे उपाधिष्टाता डॉ. राकेशकुमार वर्मा यांना अटक

सायन रुग्णालय

सायन येथील मुंबई महानगर पालिकेचे लोकमान्य टिळक रुग्णालयाचे उपाधिष्टाता डॉ. राकेशकुमार वर्मा यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात मंगळवारी रात्री सायन पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली. पुण्यातील एका डॉक्टर तरुणीला पदव्युत्तर प्रवेश मिळवून देतो, असे सांगून पैसे घेतल्याचा आरोप डॉक्टर वर्मा यांच्यावर आहे.

विद्यार्थ्यांची फसवणूक

मुंबई महापालिकेचे सायन येथील प्रसिद्ध लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या वैदयकिय महाविद्यालयात पदव्युत्तर प्रवेश देण्याच्या नावाखाली रुग्णालयाचे उपाधिष्टाता डॉक्टर राकेश कुमार वर्मा यांनी पुण्यातील महिला डॉ. अलिशा शेख यांच्या वडिलांकडून २१लाख १० हजार रुपये बँक खात्यावर आणि इतर रोखीने असे एकूण ५० लाख रुपये घेतले होते. एवढी मोठी रक्कम घेऊनही प्रवेश मिळाला नसल्यामुळे डॉ.अलिशा शेख यांनी मंगळवारी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सायन पोलीस ठाण्यात डॉ. वर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री सायन पोलिसांनी डॉ.वर्मा यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यादरम्यान अचानक डॉक्टर वर्मा यांची प्रकृती बिघडली आणि त्याचा रक्तदाब वाढल्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी लोकमान्य टिळक रुग्णलयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. डॉक्टर वर्मा यांनी अनेक वैदयकीय प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, सायन पोलीस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात असून त्यात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या पाच जणांनी प्रत्येकी ३० लाख रुपये घेऊन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून फसवणुकी केल्याची तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्यात माधव यादव (२६), विनय मिश्रा (२९), सिद्धीकी आझम अकबर (४०), राहुलकुमार सिंह यांना अटक करण्यात आली होती. या चौघांकडून पोलिसांनी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे आणि काही महत्वाचे पुरावे आढळून आले आहेत. या गुन्ह्यात देखील डॉक्टर राकेशकुमार वर्मा यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त पाटील यांनी म्हटले आहे.

लोकमान्य टिळक रुग्णालयाचे उपाधिष्टाता डॉक्टर राकेश कुमार वर्मा यांच्याबाबत रुग्णालय प्रशासनकडे अनेक तक्रारी आलेल्या असून त्या बाबत चौकशी सुरु असून डॉ.वर्मा यांच्यावर विभागीय चौकशी सुरु असून सध्या त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली आहे.


हेही वाचा – विदेशी दारु ट्रक लुटीचा बनाव चालकाच्या अंगलट


 

First Published on: December 23, 2020 10:15 PM
Exit mobile version