वाधवान प्रकरणाची चौकशी पूर्ण, कोणत्याही दबावाशिवाय पत्र दिलं – गृहमंत्री!

वाधवान प्रकरणाची चौकशी पूर्ण, कोणत्याही दबावाशिवाय पत्र दिलं – गृहमंत्री!

काही दिवसांपूर्वी उद्योगपती आणि येस बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले वाधवान बंधू आणि त्यांचे कुटुंबीय अशा एकूण २३ जणांना पालघरहून साताऱ्यात महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देणाऱ्या एका पत्रावरून मोठा गोंधळ उडाला होता. गृह विभागाच्या प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या सहीनिशी हे पत्र घेऊन वाधवान कुटुंबीय लॉकडाऊनमध्ये देखील महाबळेश्वरपर्यंत पोहोचले होते. या प्रकरणाची रीतसर चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल अखेर राज्य सरकारकडे प्राप्त झाला आहे. यामध्ये ‘प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी कुणाच्याही दबावाशिवाय हे पत्र वाधवान यांना दिल्याची बाब स्पष्ट झाली आहे’, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

अमिताभ गुप्ता यांच्या सहीचं हे पत्र त्यांनी स्वत: दिलं होतं की त्यांच्यावर कुणी या पत्रासाठी दबाव टाकला होता? अशी शंका या घटनेनंतर उपस्थित केली जात होती. लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकांना घरात थांबण्याची सक्ती केली जात असताना बड्या धेंडांना मात्र महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली जात आहे असा देखील आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वाधवान कुटुंबीयांना लागलीच ताब्यात घेऊन साताऱ्यातच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. दोनच दिवसांपूर्वी त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला होता. त्यामुळे त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला होता. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून होत असल्यामुळे आज वाधवान कुटुंबीयांना साताऱ्याहून मुंबईला आणून सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्याचा अहवाल आज सरकारला प्राप्त झाला असून त्यामध्ये अमिताभ गुप्ता यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वत:च्या मर्जीने वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची विशेष परवानगी देणारं पत्र दिलं होतं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुद्द्यावरून राजकारण केल्याची टीका विरोधकांवर केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता, ‘ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे, असे लोकं देखील जर अशा प्रकारे राजकारण करत असतील, तर ते दु:खद आहे’, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच, ‘अमिताभ गुप्ता प्रकरणावरून मधल्या काळात घाणेरडं राजकारण करण्यात आलं. ते दुर्दैवी आहे’, असं देखील अनिल देशमुख यावेळी म्हणाले.


Video : वाधवान प्रकरणातला बोलवता धनी समोर आला पाहीजे!-देवेंद्र फडणवीस

First Published on: April 26, 2020 6:20 PM
Exit mobile version