वाडिया हॉस्पिटल सुरूच राहणार

वाडिया हॉस्पिटल सुरूच राहणार

वाडिया रुग्णालय

गिरणगाव परळमध्ये प्रसूती आणि लहान मुलांवर उपचार करणारासाठी प्रसिद्ध असलेले वाडिया हॉस्पिटलला बंद होणार नसून यापुढेही सुरूच राहणार आहे. हॉस्पिटल सुरू राहवे म्हणून आता राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिका या दोघांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वाडिया हॉस्पिटलला राज्य सरकारकडे थकीत ४६ कोटी रुपयांपैकी २०१६-२०१७ सालसाठी राहिलेल्या निधीपैकी अर्धे, २४ कोटी रुपयांच्या निधी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई महापालिकेकडून २२ कोटी रुपयांचा निर्णय देण्याचे जाहीर करण्यात आल्याने हॉस्पिटलला ४६ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. दरम्यान, वाडिया हॉस्पिटल प्रश्न पूर्णपणे निकाली काढण्यासाठी समिती नेमण्यात आली असून हॉस्पिटलमधील सेवा तात्काळ सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिले आहेत.

राज्य सरकार आणि महापालिकेकडून निधी प्रलंबित असल्याचे कारण पुढे करत गेल्या काही दिवसांपासून परळ येथील वाडिया हॉस्पिटलने रुग्णासेवा बंद केल्याचे समोर आले होते. तेव्हापासून वाडिया हॉस्पिटल बंद करू नये म्हणून आंदोलने होत होती. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात बैठक घेत हा प्रश्न निकाली काढला. या बैठकीत वाडिया रुग्णालयाच्यावतीने नस्ली वाडिया, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, स्थानिक आमदार अजय चौधरी, नगरसेविका श्रद्धा जाधव आदी उपस्थित होते.

बैठकीत वाडिया हॉस्पिटल प्रशासनाची देखील बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी वरील निर्णय दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापालिका तसेच राज्य शासनाकडून ४६ कोटी देण्याबाबत निर्णय झाला आहे. रुग्णालयातील कोणत्याही कर्मचार्‍यांच्या नोकरीवर परिणाम होणार नाही. त्यामुळे तात्काळ रुग्णसेवा सुरू करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

तज्ज्ञांची समिती
वाडिया हॉस्पिटल प्रकरणी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला आहे. या समितीत राज्य सरकार, महापालिका आणि वाडिया प्रशासन यांचे सदस्य असणार आहेत. ही समिती वाडिया हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना देण्यात येणारे वेतन, रुग्णालयात वाढविण्यात आलेल्या खाटा या विषयांबाबत येत्या १० दिवसांत अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार असून त्यानंतर मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

शर्मिला ठाकरे मंत्रालयात
वाडिया हॉस्पिटल बंद होऊ नये म्हणून मागील सोमवारी अनेक संघटनांनी वाडिया हॉस्पिटलजवळ आंदोलन केले होते. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील कर्मचार्‍यांची भेट घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. मंगळवारी शर्मिला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मनसे शिष्टमंडळाने सोमवारी वाडिया हॉस्पिटलबाहेरआंदोलन केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पाच वाजता आम्हाला बैठकीसाठी वेळ दिली. त्यानुसार ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निधी वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार निधी आता वर्ग होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

First Published on: January 15, 2020 6:47 AM
Exit mobile version