नव्या सरकारबद्दल राष्ट्रवादीकडून सावधानतेचा इशारा!

नव्या सरकारबद्दल राष्ट्रवादीकडून सावधानतेचा इशारा!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता सत्तेची सूत्रे हाती घेण्यास भाजपा सज्ज झाला आहे. या नव्या सरकार समोर आव्हान म्हणून उभे राहणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने सावधानतेचा इशाराही दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बरोबर घेऊन शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केल्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने या नव्या सरकारविरोधात शड्डू ठोकले आहे. शिवसेनेत बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप भाजपाने केले आहे, हे महाराष्ट्राची जनता आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी कधीच विसरणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभा राहणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

तर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी श्री तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आधार घेत भाजपावर टीका केली आहे. ‘सत्तेसाठी हपापावे l वाटेल तैसे पाप करावे l जनशक्तीस पायी तुडवावे l ऐसे चाले स्वार्थासाठीll’ असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत, असे सांगत त्यांनी सावधानतेचा इशाराही दिला आहे.

First Published on: June 30, 2022 4:52 PM
Exit mobile version