उल्हास नदीत जलप्रदूषण – जलपर्णी समस्या

उल्हास नदीत जलप्रदूषण – जलपर्णी समस्या

उल्हासनगर

उल्हास नदीमधील जलप्रदूषण आणि जलपर्णीची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे, या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी नुकतीच उल्हास नदीची पाहणी केली. उल्हास नदीमधून उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर तसेच इतर शहरांना पाणीपुरवठा होतो. नदीच्या पात्रात उल्हासनगर शहरातील खेमानी नाला, म्हारळ नाल्याचे सांडपाणी थेट सोडले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. त्यामुळे पाण्यातील जीवजंतूंना धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या जलपर्णीने उग्ररूप धारण केले आहे. जलपर्णी पाण्यातील क्षार नष्ट करतात आणि पाण्यात विषारी रसायन सोडतात. त्यामुळे या पाण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्धभवतात.

प्रशासनाचे दुर्लक्ष

या समस्यांकडे उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल, सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हास नदीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उल्हासनगर महापालिका आयुक्त अच्युत हांगे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

खासदारांच्या पालिकेला सूचना 

उल्हास नदीत जाणाऱ्या खेमानी नाल्याजवळ उल्हासनगर महापालिका ३४ कोटी रुपये खर्च करून १० एम.एल.डी. चा एस.टी.पी. प्लांट (जलशुद्धीकरण प्रकल्प) बनवत आहेत. या प्लांटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना डॉ. शिंदे यांनी अच्युत हांगे यांना दिल्या. तसेच म्हारळ येथून रिजेन्सी अंटालिया आणि ठारवानी हाईट्स या गृहसंकुलातुन जाणाऱ्या नाल्यावरदेखील एस.टी.पी. प्लांट सुरू करण्यात यावा. रिजेन्सी आणि ठारवानी या कंपनीचे मोठे गृहसंकुले होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी तेथून नदीत सोडले जाईल. हे लक्षात घेता या संकुलांना शासनाच्या नियमावलीप्रमाणे एस.टी.पी. प्लांट बसवून घेण्याची जबाबदारी संबंधित बिल्डरची असेल उल्हासनगर महापालिका प्रशासनाने याबाबत पाहणी करावी, अशी सूचना देखील त्यांना दिली.

जलपर्णी समूळ नष्ट करा

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून लवकरात लवकर जलपर्णी समूळ नष्ट करावी, अशा सूचनादेखील उल्हासनगर मनपा आयुक्त अच्युत हांगे आणि कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त गोविंद बोडके यांना दिल्या. या सूचना दोन्ही आयुक्तांनी मान्य केल्या तसेच लवकरच हे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले .

First Published on: February 19, 2019 6:51 PM
Exit mobile version