अतिवृष्टीमुळे घरात पाणी, मात्र नळ कोरडेच

अतिवृष्टीमुळे घरात पाणी, मात्र नळ कोरडेच

मागील महिनाभरापासून पावसाची संततधार सुरूच असून पालिकेची धरणे भरून वाहत आहेत. मात्र एमजेपी आणि सिडको यांच्या वादामध्ये नवीन पनवेलकरांचे तोंडचे पाणी पळाले असल्यामुळे अखेर या नागरिकांनी सिडकोच्या कार्यालयात पाण्यासाठी टाहो फोडला आहे. सोमवारी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेलमधील नागरिकांनी सिडकोवर पाण्यासाठी मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला, यावेळी सिडको प्रशासनातर्फे याबाबत त्वरित उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

महिनाभर सुरू असलेल्या पावसाच्या तुलनेत गेल्या तीन दिवसांत पनवेलसह कोकणामध्ये पडलेल्या पावसाची सरासरी अधिक प्रमाणावर होती. वेधशाळेने देखील अतीवृष्टीचा दिलेला इशारा खरा ठरला आणि संपूर्ण कोकणासह ठाणे, बदलापूर, मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पाणीच पाणी पाहावयास मिळाले. पनवेलमधील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले मात्र पिण्यासाठी नळाला पाणी नाही, अशी स्थिती येथील रहिवाशांची होती.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सिडकोकडून सांगण्यात येत होते. नवीन पनवेल परिसराला 42 एमएलडी पाण्याची गरज आहे. परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 25 ते 28 एमएलडी इतकेच पाणी सिडकोला उपलब्ध होत असते. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागते. अतिवृष्टीमुळे गेल्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपसा केंद्रावर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे पाणीपुरवठा 19 एमएलडीवर आला होता. याबाबत अधीक्षक अभियंता पी.बी. काळे यांनी मात्र लवकरच पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचे आश्वासन यावेळी रहिवाशांना दिले.

First Published on: July 30, 2019 4:46 AM
Exit mobile version