पश्चिम रेल्वेच्या महिला डब्याची ओळख बदलणार

पश्चिम रेल्वेच्या महिला डब्याची ओळख बदलणार

पश्चिम रेल्वेवरील महिलांच्या डब्यावरील लोगो बदलणार

पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यावर साडी आणि पदर घेतलेल्या महिलेचे चित्र दिसून येत होते. मात्र पश्चिम रेल्वे आता या चित्रातील पदर काढून घेणार असून त्या जागी कॉर्पोरट क्षेत्रात काम करणारी सुटाबुटातील, आधुनिक महिलांचे प्रतिनिधित्व करणारे छायाचित्र दिसून येणार आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या महिला डबा येथून पुढे विशेष आधुनिक वेशातील महिलांच्या लोगोने ओळखला जाणार आहे.

मायानगरी मुंबई कॉर्पोरेट क्षेत्रासाठी खूप प्रसिद्ध आहे. या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर आता महिलांचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुरुषांबरोबर महिलासुद्धा आधुनिक झाल्या आहेत. या महिला सुद्धा रेल्वे प्रवास करतात. रेल्वे प्रवासात महिलांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सुखद प्रवास व्हावा, यासाठी सुद्धा रेल्वेकडून अनेक गाड्या लेडीज स्पेशल चालतात. त्यामुळे आज आधुनिक वेशातील महिलांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पश्चिम रेल्वेने महिल्या डब्यावरील साडी आणि पदर घेतलेल्या महिलेचे चित्र काढून टाकण्याची तयारी केली आहे.

नव्या चित्राचे १२ डबे तयार

त्या जागी आता फॉर्मल सूट परिधान केलेल्या आधुनिक महिलेचे चित्र (लोगो) लावणे सुरू केले आहे. सध्या पश्चिम रेल्वेने या नव्या चित्राचे १२ डबे तयार केले आहेत. हे डबे लवकर पश्चिम रेल्वेवर उपलब्ध होणार आहे. पश्चिम रेल्वेने या लोगोसाठी अभ्यास केल्याचं सांगण्यात येत आहे. महिला डब्यावरील साडी आणि पदर असलेल्या महिला या मुंबईतील आधुनिक युगातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे पश्चिम रेल्वेच्या अभ्यासात पुढे आले होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने हा नवा आधुनिक वेशातील महिलांचा लोगो बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या सोबतच महिलांच्या डब्यात बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, क्रिकेटपटू मिताली राज आणि अंतराळवीर कल्पना चावला यांची छायाचित्रे दिसणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

First Published on: May 27, 2019 9:25 PM
Exit mobile version