अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार – विद्यार्थी चिंतेत

अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार – विद्यार्थी चिंतेत

नोव्हेंबरपासून कॉलेज सुरू करण्यासंदर्भात यूजीसीने निर्देश दिले आहेत. मात्र मराठा आरक्षणामुळे प्रवेश प्रक्रियाच ठप्प झाली आहे. त्यामुळे आता आमचे प्रवेश कधी होणार अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे थांबवण्यात आलेली अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आता आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश कधी मिळणार? प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार? या प्रश्नांची उत्तरे सापडली नसून ते अडचणीत सापडले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा निकाल नेहमीपेक्षा उशीराने जाहीर झाला. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. अकरावी प्रवेशामध्ये एकूण जागांच्या १२ टक्के जागावर मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र मराठा (एसईबीसी) आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून मिळालेल्या स्थगितीनंतर दुसर्‍या फेरीपासून पुढील प्रक्रिया स्थगित करण्यात आली. तब्बल ४७ दिवस उलटले तरी ही प्रक्रिया सुरू झाली नाही. असे असतांना प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे.

महाविद्यालयात उपलब्ध जागांपैकी बहुतांश जागा भरल्यावर अध्ययन प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जातात. परंतु अकरावी प्रवेशाची पहिल्या फेरीमध्ये फारसे प्रवेश झालेले नाही. या विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा की नाही, असा पेच महाविद्यालयांपुढे उभा राहिला आहे. अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतल्यास, नंतर प्रवेशित होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नव्याने वर्ग घ्यावा लागण्याची वेळ येणार असल्याने महाविद्यालयांपुढील आव्हान वाढले आहे. दुसरीकडे अध्ययन प्रक्रियेला विलंब झाल्याने मर्यादित वेळेत शिक्षणक्रम पूर्ण करणे कठीण होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे

First Published on: October 28, 2020 6:57 PM
Exit mobile version