उद्धव ठाकरेंना घेरणारे ते बडवे कोण?

उद्धव ठाकरेंना घेरणारे ते बडवे कोण?

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 46 आमदारांनी बंडखोरी केल्याने मविआ सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून आपमानास्पद वागणूक मिळाल्याचा ठपका शिंदे यांनी ठेवला असून भाजप बरोबर येण्याची अट त्यांनी ठाकरे सरकारला घातली आहे. यावर उद्धव यांनी बंडखोर आमदारांना समोर येऊन चर्चा करण्याचे भावनिक आवाहन केले. त्यानंतर वर्षा बंगला सोडून उद्धव ठाकरे मातोश्री या आपल्या स्वगृही परतले. या प्रसंगी उद्धव ठाकरेंना निरोप देण्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ठाकरेंनीही सगळ्यांचे आभार मानले. अनेकांनी त्यांच्याबद्दल असलेल्या आपल्या भावनांना अश्रूमधून मोकळी वाट करून दिली. अवघ्या देशाने हा प्रसंग पाहिला. त्यानंतर राज्यात शिंदें विरोधात शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले. याचपार्श्वभूमीवर शिंदेंबरोबर गलेले आमदार संजय शिरसाट यांचे उद्धव यांना लिहीलेले एक खरमरीत पत्र खुद्द शिंदे यांनी ट्विट केले आहे.

या पत्रात शिरसाट यांनी उद्धव यांच्या अवतीभवती असणाऱ्या बडव्यांना नाव न घेता लक्ष्य केले आहे. या बडव्यांमुळे उद्धव साहेब आणि आमच्यात दुरावा आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे हे बडवे नक्की कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे. दरम्यान सध्या उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, वरुन सरदेसाई, हेच उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळ असल्याने शिरसाट यांच्या पत्राचा रोख याच तिघांवर असल्याचे बोलले जात आहे.

मिलिंद नार्वेकर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासातले मिलिंद नार्वेकर आहेत. तसेच त्यांचा गटप्रमुख ते उद्धव ठाकरे यांचे सचिव ते शिवसेना सचिव असा राजकीय प्रवास राहिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिवसातील सर्व भेटीगाठींची नोंद आणि वेळा नार्वेकरच ठरवतात.

उद्धव ठाकरे मितभाषी असल्यामुळे सहसा कोणाला भेटत नाहीत. मात्र, अत्यावश्यक घडामोडी असल्यावरच ते नेते मंडळी अथवा अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा देतात. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वेळा मिळवण्यासाठी, महत्वाचे निर्णय, घडामोडी सूचना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी अनेक नेतेमंडळींना आणि अधिकाऱ्यांना नार्वेकर यांच्या मागेपुढे करावे लागते. अन्यथा त्यांना तासनतास वर्षा बंगल्याबाहेर ताटकळत राहावे लागते. याच पाश्वभूमीवर शिंदे यांनी देखील अनेक वेळा नार्वेकरांविरोधात तक्रारीचा सूर काढला होता. त्यावरूनच शिरसाट यांनी या पत्रात नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख न करता निशाणा साधला आहे.

संजय राऊत – सामना वृत्त पत्राचे संपादक संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात. ते शिवसेना पक्षाचे राज्यसभेचे खासदार असून त्यांची खासदारकीची तीसरी टर्म सुरू आहे. ते राज्यसभेत शिवसेना गटनेते म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. पक्षाच्या भूमिका मांडण्याचे काम संजय राऊत यांच्याकडे आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी निकटचे संबंध असल्याने उद्धव यांना पक्षातील लहान सहान बाबी निदर्शनास आणून देणे. त्यावर त्यांच्याशी सल्ला मसलत राऊत करतात. यामुळे उद्धव यांना राऊत हेच अधिक जवळचे वाटतात. परिणामी एकनाथ शिंदेसारख्या जेष्ठ नेत्यांना मातोश्रीवर डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. म्हणून शीरसाट यांनी या सर्व गोष्टींचा दाखला नाव न घेता आपल्या पत्रात दिला आहे.

वरून सरदेसाई – सिव्हिल इंजिनियर असलेले वरूण सरदेसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहीणीचे पुत्र आहेत. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यात जवळचे संबंध असून शिवसेनेच्या आयटी सेलचे ते प्रमुख आहेत. आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेचे नियोजनही वरूण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. ते शिवसेनेच्या स्टार प्रचारकाचीही भूमिका त्यांनी पार पाडली आहे. अदित्य ठाकरे वरून यांचे फक्त मावस भाऊ नसून त्यांच्यात घट्ट मैत्रीचे देखील नाते आहे. यामुळे बऱ्याचवेळा पक्षातील जेष्ठांशी चर्चा न करता आदित्य वरून यांच्याशी सल्ला मसलत करून निर्णय घेतात. हेच पक्षातील जेष्ठांना रूचत नसल्याने वरून सरदेसाईंनाही पक्षांतर्गत विरोध आहे. शिरसाट यांच्या पत्रात याबद्दलच उद्धव ठाकरेंना सांगण्यात आले आहे.

First Published on: June 23, 2022 6:24 PM
Exit mobile version