कल्याणचा सुभेदार कोण ?

कल्याणचा सुभेदार कोण ?

ठाणे जिल्हयातील सर्वात महत्वाचा लोकसभा मतदार संघ म्हणून ” कल्याण ” मतदारसंघ ओळखला जातो. ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असल्याने पुत्रासाठी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील हे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आजी- माजी पालकमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई समजली जात आहे. कळव्यापासून ते अंबरनाथपर्यंतचा परिसर हा या मतदार संघात मोडतो. कल्याणात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढाई शिंदे आणि पाटील यांच्यात होणार आहे. २९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रचाराचा आणि जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे.

मागील निवडणुकीसारखा मोदी लाट ओसरल्याचे दिसून येत आहे. कल्याण लोकसभेत मराठा, उत्तरभारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लीम, मारवाडी आणि गुजराती समाज आहे. तसेच स्थानिक भूमीपुत्र, आरएसएस. हिंदुत्ववादी संघटना यांचाही समावेश मतदार संघात आहे. त्यामुळे संमिश्र मतदारसंघ म्हणूनच ओळखला जातो. सेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जाहिरसभा घेऊन भाजपवर प्रहार करीत आहेत. त्याचा फायदा कल्याणात राष्ट्रवादीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याणातील २७ गावे आणि नवी मुंबईतील १४ गावांचा परिसर या मतदार संघात येतो. इथे आगरी कोळी भूमीपुत्र मोठ्या प्रमाणात आहे.

दोघांनीही आगरी समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी जोर लावला आहे. या परिसरात सुमारे दीड लाख आगरी मते आहेत. ही मते दोन्ही कडे विभागण्याची शक्यता आहे. पालकमंत्री शिंदे यांनी मुलासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. तर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यासाठी कंबर कसली आहे. या परिसरात दलित आणि मुस्लीम समाजाची मतेही मोठ्या प्रमाणात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाव हे रिंगणात आहेत. त्यामुळे ही मते पटकवण्यात ते यशस्वी होतात का, हेच पाहावे लागणार आहे. मात्र, खरा सामना हा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात होणार आहे. त्यामुळे कल्याणचा सुभेदार कोण हे 23 मे ला स्पष्ट होणार आहे.

First Published on: April 26, 2019 4:11 AM
Exit mobile version