मुंबईच्या आयुक्तपदी अजोय मेहतांना मुदतवाढ?

मुंबईच्या आयुक्तपदी अजोय मेहतांना मुदतवाढ?

अजोय मेहता

२०१९ पर्यंत अजोय मेहता मुंबईच्या आयुक्तपदी कायम राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कडक शिस्तीचे अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपला तरी अद्याप त्यांची बदली झालेली नाही. मेहता यांची बदली कधी होणार? अशी कुजबुज पालिका अधिकाऱ्यांमध्ये गेले महिनाभर सुरु आहे, पण, मेहता जानेवारी २०१९ पर्यंत पालिकेच्या आयुक्तपदीच राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. मेहता हे आणखी आठ महिने पालिका आयुक्तपदी राहणार असल्याने कामचुकार अधिकारी आणि भ्रष्ट कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

एप्रिल २०१५ मध्ये मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. मेहता यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर शहराचा विकास आराखडा बनवण्याची जबाबदारी देण्यात आली. विकास आराखड्याचे काम सुरु असताना महापालिकेत नालेसफाई, रस्ते, डेब्रिज यासारखे घोटाळे झाले. मेहता यांनी या घोटाळ्यांची चौकशी करून दोषी अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कारवाई केली. अधिकारी आणि कंत्रादारांवर यांच्यावर कारवाई झाल्याने पालिकेतील इतर अधिकारी धास्तावले आहेत. दर महिन्याला होणाऱ्या आढावा बैठकीत सर्वच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जात असल्याने अनेक अधिकाऱ्यांमधून आयुक्तांची बदली कधी होणार याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. एप्रिल महिन्यात आयुक्तांना तीन वर्षे पूर्ण झाल्याने या चर्चेला आणखी वेग आला आहे.

अधिकाऱ्यांमध्ये आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरु असताना राजकीय वर्तुळातही आयुक्त कधी पर्यंत पालिकेत राहतात याची चर्चा सुरु आहे. मेहता यांनी गेल्या तीन वर्षात सत्ताधारी शिवसेनेला लगाम घातला आहे. यामुळे शिवसेनेला निर्णय घेताना अनेक अडचणी निर्मांण झाल्या आहेत. याचवेळी भाजपाला हवा तसा विकास आराखडा बनवून खास करून मुख्यमंत्र्यांना खुश केले आहे. डिसेंबर महिन्यात कमला मिल येथील दोन पबला आग लागली होती. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल मेहता यांनी जानेवारीमध्ये मुख्यमंत्र्यांना सादर केला. कमला मिल परिसरात विकास नियंत्रण नियमावली व माहिती तंत्रज्ञान धोरण यांचा गैरवापर केला गेल्याने कारवाईसाठी मेहता यांनी मुख्यमंत्र्यांकडे ३ महिन्याची मुदत मागितली होती. मेहता यांनी मागितलेली मुदत एप्रिल महिन्यात संपली आहे. कमला मिल आगीची सध्या चौकशी सुरु आहे. विकास आराखड्याचा एक भाग मंजूर झाला असला तरी दुसरा भाग येत्या तीन ते चार महिन्यात मंजूर होणार आहे. मागील वर्षी मुंबईची तुंबई झाली होती. या पार्श्वभुमीवर पावसाळा तोंडावर आला असल्याने पावसाळ्यादरम्यान मेहता यांची बदली होणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

येत्या जानेवारी दरम्यान राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन निवृत्त झाल्यावर मुख्यमंत्र्यांची कृपा राहिल्यास मेहता यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती होऊ शकते मात्र त्यासाठी त्यांच्यापेक्षा सहा ते सात जेष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला करून बदली करावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

First Published on: May 18, 2018 7:44 AM
Exit mobile version