खाकी वर्दीला सलाम! प्रसंगावधानामुळे पोलिसांच्या गाडीतच महिलेची सुखरूप प्रसुती

खाकी वर्दीला सलाम! प्रसंगावधानामुळे पोलिसांच्या गाडीतच महिलेची सुखरूप प्रसुती

खाकी वर्दीला सलाम! प्रसंगावधानामुळे पोलिसांच्या गाडीतच महिलेची सुखरूप प्रसुती

मुंबई साऱख्या गजबजलेल्या आणि धावपळीच्या ठिकाणी वावरत असताना मुंबईकरांची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर असतात. याचा नेहमीच प्रत्यय हा मुंबईकरांना येत असतो आणि याचंच उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. माणुसकी, विश्वास अधिक वाढेल अशी कामगिरी मंगळवारी मुंबई पोलिसांनी केली आहे. वरळी नाका येथे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास एका गरोदर महिलेला रस्त्याने जात असताना अचानक चक्कर आली आणि ती पडली. रस्त्यावर असलेल्या लोकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या दोन गाड्या त्या ठिकाणी दाखल झाल्यात. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना ती महिला गरोदर असल्याचे समजले, यावेळी महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या होत्या. परंतु या महिलेसोबत तिच्या कुटुंबातील किंवा तिच्या ओळखीचे कोणीही नव्हते.

रुग्णवाहिका बोलवण्याइतका पोलिसांकडे वेळ नसल्याने पोलीस उपनिरीक्षक पाटील, महिला कॉन्स्टेबल सपकाळ, ASI मानेसह इतर कर्मचाऱ्यांनी पादचारी स्थानिक नागरिक प्रिया जाधव हिच्या मदतीने गरोदर महिलेला नायर रुग्णालयात नेले. मात्र महिलेची प्रकृती नाजूक होती आणि तिच्या प्रसुती कळा वाढत होत्या. रुग्णालयाल लांब असल्यामुळे या गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना तिची मुंबई पोलिसांच्या गाडीतच प्रसुती झाली. महिला आणि बाळ दोघे सुरक्षित असून पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला ही ७ महिन्यांची गरोदर होती मात्र वेळेपूर्वीच तिची प्रसुती झाली. आई सुरक्षित असून बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

वरळी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार सपकाळ, वळवी, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, लोहार या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांच्या वरिष्ठांकडून केलेल्या या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात आले आहे.


First Published on: April 14, 2021 9:25 AM
Exit mobile version