मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवसस्थानावर कोरोनाचा शिरकाव; महिला पोलीस कोरोनाबाधित

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवसस्थानावर कोरोनाचा शिरकाव; महिला पोलीस कोरोनाबाधित

वर्षा बंगला

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील आता कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. वर्षा बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सदर कोरोनाबाधित महिला अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेले सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यात वास्तव्यास नसून ते वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी राहतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मातोश्रीवरील देखील एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

संपर्कात आलेल्यांना केले क्वॉरंटाइन

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर संबंधित महिला पोलीस अधिकारी झोन टूमधील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी तिची ड्युटी वर्षा बंगल्यावर लागली होती. दरम्यान, तिची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना देखील क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याभोवती कडेकोट बंदोबस्त करण्यात येतो. विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इथे खडा पहारा देत असतात. याच सुरक्षेसाठी संबंधित महिला अधिकारीही बंदोबस्तावर होती. दरम्यान, महिला अधिकारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. तसेच या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४ हजार ६६६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात १८ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – …नाहीतर २३ एप्रिलला IMAचे डॉक्टर काळा दिवस पाळणार


 

First Published on: April 21, 2020 8:09 PM
Exit mobile version