पोलिसाकडून लाच घेताना महिला पोलिसाला अटक

पोलिसाकडून लाच घेताना  महिला पोलिसाला अटक

एम.पी.के.वाय आरोग्य योजनेअंतर्गत मंजूर झालेले बिल पास करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेणार्‍या लेखा शाखा विभागातील महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी खोब्रागडे (३७) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून अटक करण्यात आली आहे. पोलीसच पोलीस कर्मचार्‍याकडून लाच घेत असल्याने सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.मीनाक्षी खोब्रागडे या सीबीडी पोलीस ठाण्यात लेखा शाखा विभागात लिपीक आहेत. त्याच पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याच्या वडिलांचे ऑपरेशन झाले होते. त्या ऑपरेशनचे एम.पी.के.वाय आरोग्य योजना, मुंबई येथून मंजूर होऊन आलेले वैद्यकीय बिल ट्रेझरीमध्ये पाठवायचे होते.

त्यासाठी त्यांनी खोब्रागडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. बिल ट्रेझरीमध्ये पाठवायचे असेल तर त्यासाठी ८ हजार रुपये द्यावे लागतील, असे खोब्रागडे यांनी पोलीस कर्मचार्‍याला सांगितले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. या तक्रारीवरून बुधवारी पोलीस ठाणे परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारी २ नंतर खोब्रागडे यांनी ८ हजार रुपयांची रक्कम पोलीस कर्मचार्‍यांकडून स्वीकारताच त्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास धनाजी जळक करत आहेत.

First Published on: December 13, 2018 5:29 AM
Exit mobile version