शिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत

शिस्तभंग प्रकरणी महापालिकेच्या महिला अधीक्षक निलंबीत

उल्हासनगर महापालिका

उल्हासनगर महानगरपालिका महिला व बाल कल्याण विभागात कार्यरत असलेल्या महिला अधीक्षक अलका पवार यांची आयुक्तांच्या आदेशाने अन्य विभागाचा पदभार सोपवण्यात आला होता. परंतु त्यांनी आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी आज शनिवारी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पवार यांना निलंबित केले आहे.

नेमके काय घडले?

महिला व बाल कल्याण विभागात अधिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अलका पवार यांना मागील महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचा पदभार महापालिका प्रशासनाने सोपवला होता. परंतु त्यांनी महिला व बाल कल्याण विभागाचा पदभार संबंधितास न सोपवत नवीन पदभार सुद्धा स्वीकारला नाही. याबाबत मनपा प्रशासनाने अलका पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असता त्यांनी ती नोटीस घेण्यास नकार दिला. तसेच त्यांनी कोणत्याही संबंधीत अधिकाऱ्याची परवानगी न घेता किंवा रजा मंजूर न करता कार्यालयातून निघून गेल्या. अलका पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अशा प्रकारे अवमान केला. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४(१) ४(२) नुसार अधीक्षक अलका पवार यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून २१ सप्टेंबर पासून निलंबित केल्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय जाधव , अभियंता परमेश्वर बुडगे आणि शिपाई केणे यांना बेकायदेशीर बांधकाम आराखडा मंजूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. आयुक्तांच्या या कारवाईने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच या संदर्भात अलका पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.


हेही वाचा – उल्हासनगरात २१४ धोकादायक तर ४१ अतिधोकादायक मालमत्ता!


 

First Published on: September 21, 2019 10:04 PM
Exit mobile version