मुंबईत डायबिटीसमुळे वर्षभरात 14 टक्के मृत्यू; पालिकेची चिंताजनक माहिती

मुंबईत डायबिटीसमुळे वर्षभरात 14 टक्के मृत्यू; पालिकेची चिंताजनक माहिती

चुकीची जीवनशैली, अवेळी खाणं, शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे डायबिटीस, ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतेय. यात मुंबईत 18 ते 69 वयोगटातील 18 टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. यामुळे 2021 या वर्षात एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूमागे डायबिटीस हे कारण होते. त्यामुळे मुंबईत सर्वाधिक मृत्यू हे डायबिटीसमुळे होत असल्याचे चिंता व्यक्त होतेय. 13 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिकेने याबाबत माहिती जाहीर केली आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील रक्तदाब आणि असंसर्गजन्य आजारांची स्थिती जाणून घेण्यासाठी डिसेंबर 2022 पासून मुंबईतील झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीने वसलेल्या बैठ्या चाळींमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण या संस्थेच्या सन 2021 च्या अहवालानुसार, जगातील सात मधुमेही रुग्णांपैकी 1 रुग्ण हा भारतीय आहे. यात राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, मुंबईतील 17 टक्के महिलांमध्ये तर 18 टक्के पुरुषांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण 140 मिलिग्रॅम पेक्षा अधिक आढळले आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने सन 2021 मध्ये केलेल्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार, एकूण मृत्यू नोंदणीपैकी 14 टक्के मृत्यूचे कारण मधुमेह असे नोंदवले गेले आहे.

मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दर महिन्याला सुमारे 50 हजार रुग्ण मधुमेह आजारावर उपचार घेत आहेत. 30 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 1 लाख 3 हजार 420 महिलांची मधुमेहाविषयक तपासणी केली आहे. यातील तब्बल 7 हजार 475 महिलांनी मधुमेह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी आता मधुमेह अर्थात डायबिटीस हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे दिसतेय.


हेही वाचा : …तर गर्दीत रोज शेकडोंनी विनयभंग होतात; आव्हाडांवरील दाखल गुन्ह्यानंतर पत्नीचं ट्विट


First Published on: November 14, 2022 12:43 PM
Exit mobile version