ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भोईर यांना गुन्हे शाखेकडून अटक

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भोईर यांना गुन्हे शाखेकडून अटक

मुंबईः ठाकरे गटाचे कांदिवली येथील माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मंगळवारी रात्री गुन्हे शाखेने अटक केली. सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर भोईर यांना गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने अटक केली. रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

विकासकाकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा भोईर यांच्यावर आरोप आहे. खंडणी व सावकारी कायद्यातंर्गत भोईर यांच्याविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात त्यांना जामीनही मंजूर झाला होता. त्यामुळे भोईर यांची अटक बेकायदा असल्याचा दावा भोईर यांच्या पत्नीने केला आहे. या अटकेचा त्यांनी निषेध केला आहे. मात्र भोईर यांच्याविरोधात एका वेगळ्या प्रकरणाची चौकशी सुरु होती. त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. आधीच्या प्रकरणाचा या अटकेशी काहीही संबंध नाही, असे गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे.

भोईर यांच्या अटकेने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. ही अटक हेतूपूरस्सर केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलीस भोईर यांना पोलीस ठाण्याच्या बाहेर घेऊन आले होते. आपण सर्व शिवसैनिक आहोत. त्यामुळे गोंधळ करु नका, न्यायालयात सत्य समोर येईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे काहीही करु नका, असे आवाहन भोईर यांनी कार्यकर्त्यांना केले. मात्र कार्यकर्त्यांच्या घोषणा काही थांबवल्या नाहीत.

अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भोईर यांना कांदिवली येथून दक्षिण मुंबईतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात रात्रीच हलविण्यात आले. आज, बुधवारी सकाळी ११ वाजता भोईर यांना महानगर दंडाधिकारी कार्यालयात हजर केले जाईल. त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी गुन्हे शाखा न्यायालयात करेल. त्यावेळी भोईर यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे हे स्पष्ट होईल.

शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी या अटकेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, मिंदे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या नेत्यांवर विनाकारण गुन्हे नोंदवण्याचे काम सुरु आहे. एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावतात व दुसऱ्याच गुन्ह्यात अटक करतात. ही सर्व कारवाई दबावाखाली सुरु आहे.

First Published on: December 28, 2022 8:58 AM
Exit mobile version