बनावटी पिस्तूल, जिवंत काडतूससह तरूणाला अटक

बनावटी पिस्तूल, जिवंत काडतूससह तरूणाला अटक

अंबरनाथ येथे एका तरुणाला घातक शस्त्र बाळगण्यावरुन अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घातक शस्त्र जवळ बाळगण्यास परवानगी नसताना देखील या तरुणाने आदेशाचे उल्लंघन करत बनावटी पिस्तूल, जिवंत काडतूससह गांजा बाळगला होता. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका तरूणाला बनावटी पिस्तूल, जिवंत काडतूस, धारदार सुऱ्यासह एक किलो ७१५ ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील पवार सेक्शन चिखलोली येथील जय मल्हार हॉटेलसमोर रात्री ८.३० च्या सुमारास एक तरूण राखाडी रंगाच्या मारूती सुझूकी गाडीतून गांजा हा अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक बग्गा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला. त्यावेळी राखाडी रंगाची गाडी येताच पोलिसांनी ती गाडी थांबवून गाडीची तपासणी केली. त्या गाडीतून १ किलो ७१५ ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ तसेच १ बनावटी गावठी पिस्तूल, १ लोखंडी धारदार सुरा, २ जिवंत काडतूस, मोबाईल फोन, मारूती गाडीसह २ लाख ७ हजार २०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मारूती कारमधील चंद्रकांत राठोड (२७) या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी संजय गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हाजर केले असता ११ ऑक्टोबरपर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी देण्यात आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – निवडणूक फ्लाईंग स्कॉटसोबत वाद घालणे महागात पडले; त्या अभिनेत्रीला अटक


First Published on: October 8, 2019 8:21 PM
Exit mobile version