एपीएमसीच्या बाजारात हापूसच्या नावाखाली केमिकलयुक्त कर्नाटकी आंबा

एपीएमसीच्या बाजारात हापूसच्या नावाखाली केमिकलयुक्त कर्नाटकी आंबा

नवी मुंबई: उन्हाळा सुरु झाल्यानंतर आपल्या सर्वांना आवडणार्‍या हापूस आंब्याची चव चाखावीशी वाटते. परंतु जर तुम्ही बाजारात हापूस घेत असाल तर आता सावधान असणे आवश्यक आहे. तुर्भेतील एपीएमसीच्या बाजारात हापूस आंब्याच्या नावाखाली केमिकल फवारणी करून कर्नाटकी आंब्यांची विक्री काही व्यापार्यांकडून सुरु आहे.हापूस आंब्याच्या पेटीला असणारा भाव या केमिकल युक्त बनावट हापूसला लावून ग्राहकांची लुटमार केली जात असून नागरिकांच्या आरोग्याशी देखील खेळले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
एपीएमसीच्या फळ बाजारात उन्हाळ्यातील रसदार कैरी,आंबा, द्राक्षे, कलिंगड या फळांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. एप्रिल महिन्यात आंब्याची आवक वाढली आहे.एपीएमसीत सध्या अस्सल देवगडचा हापूस आंबा हा ८०० ते १००० रुपये डझनने विकला जातो तर कर्नाटक हापूस आंबा हा ८० ते १०० किलोने विकला जात आहे.
ग्राहकांना देवगडचा आंबा हवा पण देवगडच्या आंब्यांची आवक कमी असल्याने एपीएमसी मार्केटमधील देवगड आंब्यांच्या पेटित कर्नाटकी आंबा भरून हापूस असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.
केमिकल इथरेलद्वारे पिकवलेला आंबा हा वरुन पिवळा दिसतो. वरवर पाहता हा आंबा आकर्षक दिसतो. मात्र याची चव तुरट आंबट लागते. त्यामुळे चवीसोबतच नागरिकांच्या आरोग्या सोबतच खेळ खेळला जात असल्याची चर्चा बाजारात सुरु आहे. रायपनिंग चेम्बरमध्ये इथरेलच्या फवारणीसाठी मान्यता आहे परंतु तयार आंब्यावर केली जाणारी केमिकलची फवारणी अत्यंत घातक आहे. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, गुंगी येणे, झोप लागणे आणि मानसिक तणावासोबतच चेतनासंस्थेवर परिणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.याबाबत बाजार समितीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

बंगाली टोळी कार्यरत
सध्या फळ मार्केटमध्ये आंबाच्या हंगामात चार महिन्यासाठी बंगाली टोळी बाजारात उतरली आहे.रात्रीच्या वेळी बाजारात या कामगारांचा वावर सुरु असतो. तर दिवसा कर्नाटकी आंब्याची नवी मुंबई शहराभर फिरुन हापूसच्या नावाखाली विक्री केली जाते.

रात्रीस चालतो खेळ
फळ बाजारात रात्रीच्या वेळी कॅरेटमधून आलेले कर्नाटकी कच्चे आंबे गाळयात उतरविले जातात.त्यानंतर देवगडचा लेबल असणार्‍या लाकडी आणि कागदी पेट्यांमध्ये केमिकलची फवारणी करून बनावट देवगड हापूस आंब्याची पेटी तयार केली जाते. दोन दिवसांत हा हिरवागार आंबा पिवळा धमक होतो.त्यानंतर लगेच याची विक्री केली जाते. हा खेळ संपूर्ण रात्रभर गाळयाच्या अवती भवती सुरु असतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

First Published on: April 22, 2023 10:21 PM
Exit mobile version