परीक्षा कालावधीत कोंकण विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ – आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

परीक्षा कालावधीत कोंकण विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ – आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणार्‍या इयत्ता १२ वी व इयत्ता १० वी च्या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नये यासाठी कोकण विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.
‘कॉपीमुक्त अभियानां’तर्गत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत. याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उदबोधन करण्यात येणार असून, या अभियानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी तसेच परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी विभागनिहाय व जिल्हानिहाय भरारी पथक, दक्षता समिती आणि बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इयत्ता १२ वी व इयत्ता १० वी या विद्यार्थांच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्प्यावरील परीक्षा निकोप वातावरणात होण्यासाठी व त्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी हे महत्वपूर्ण अभियान राबविण्यात येत असून, या अभियानास यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्तरावरील सरपंचापर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) ची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी, २०२३ ते दि. २१ मार्च, २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची परीक्षा दि. ०२ मार्च, २०२३ ते दि. २५ मार्च, २०२३ या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे.

First Published on: February 10, 2023 9:22 PM
Exit mobile version