सीबीडी बेलापूर कोविड १९ लसीकरण केंद्राची आयुक्तांकडून पाहणी

सीबीडी बेलापूर कोविड १९ लसीकरण केंद्राची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ फेब्रुवारीपासून कोव्हीड १९ लसीकरणाला सुरूवात झालेली असून १४ मार्चपर्यंत ४७३८७ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. पहिल्या टप्प्यातील डॉक्टर्स आणि इतर आरोग्यकर्मी तसेच दुस-या टप्प्यातील पोलीस सुरक्षा असे पहिल्या फळीतील कोरोनायोध्दे यांच्याप्रमाणेच 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या सहव्याधी (कोमॉर्बिड) व्यक्ती यांच्या लसीकरणास सुरूवात झालेली आहे.

कोविडची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर येणा-या नागरिकांची गैरसोय होऊ नये याबाबत दक्षता घेतली जात असून आयुक्त अभिजीत बांगर यांचे या बाबीकडे विशेष लक्ष आहे. सोमवारी बेलापूर विभागाचा पाहणी दौरा करतानाही त्यांनी सेक्टर 1 सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी केली. या ठिकाणी नोंदणीकरिता रांगेत असलेल्या नागरिकांना बसण्यासाठी केलेली आसन व्यवस्था अपुरी असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यामध्ये त्वरित वाढ करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे नागरिकांना जास्त वेळ थांबायला लागू नये याकरिता नोंदणी कक्षात आणखी एक काऊंटर वाढविण्याच्या तसेच प्रत्यक्ष लसीकरणासाठी व्हॅक्सिनेटर वाढविण्याचे आदेशित केले.

याठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर अनिवार्य असल्याचे सांगितले व मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. लसीकरण करण्यास सुरूवात झाल्यानंतर लगेच ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींना लसीकरण केले जात आहे याचे महत्व लक्षात घेऊन मास्क, सोशल डिस्टन्सींग आणि सतत हात धुणे ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री जोपर्यंत सर्व नागरिकांना लस देऊन होत नाही तोपर्यंत पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले.

सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरुळ व ऐरोली येथील ३ रूग्णालये, तुर्भे येथील माता बाल रुग्णालय तसेच १८ नागरी आरोग्य केंद्रे अशा २२ ठिकाणी कोविड १९ लसीकरण केंद्रे सुरू असून तेथे विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळी लस घेता यावी याकरता महानगरपालिकेच्या तिन्ही रुग्णालयांमध्ये अहोरात्र २४ तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून माता बाल रूग्णालय तुर्भे याठिकाणी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय १८ नागरी आरोग्य केंद्रांठिकाणी सोमवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार असे आठवड्याचे ४ दिवस सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय १५ खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येत असून प्रतिडोस रू. २५० इतक्या शासनमान्य दराने लसीकरण केले जात आहे. कोव्हीडची लस अतिशय सुरक्षित असून नागरिकांनी आपला क्रमांक येईल तेव्हा लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

First Published on: March 16, 2021 5:22 PM
Exit mobile version