कोविडमुळे अनाथ, विधवा झालेल्यांना पालिकेकडून मदत

कोविडमुळे अनाथ, विधवा झालेल्यांना पालिकेकडून मदत

कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई व वडील असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले अनाथ झालेली आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मिकरित्या सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशा अनाथ बालकांची तसेच कोविडमुळे पतीचे आकस्मिक निधन झालेल्या महिलांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही महापालिकेची सामाजिक बांधिलकी आहे, हे लक्षात घेत अशा संकटकाळात अनाथ मुलांना तसेच पती गमावलेल्या पत्नीला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

कोविडमुळे दोन्ही पालक, एक पालक गमावलेल्या मुलांकरता कल्याणकारी योजना, तसेच दोन्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरता अर्थसहाय्य अशा वरील टप्प्यांनुसार ते बालक १८ वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणाऱ्या अर्थसहाय्यास पात्र राहील. अनाथ मुलांच्या शिक्षणाकरता पालिकेमार्फत आधीपासूनच स्वतंत्र योजना सुरू असल्याने, कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या १८ ते २१ वयोगटातील बेरोजगार युवक-युवतींकरता शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी अर्थसहाय्य ५० हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येणार आहे. कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलांकरता कल्याणकारी योजना असून पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरकमी अर्थसहाय्य १ लाख ५० हजार रुपये तसेच स्वयंरोजगारासाठी साहित्य संच उपलब्ध करून घेण्याकरता अर्थसहाय्य करणे. शिवाय स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलेला संपूर्ण हयातीत एकदाच १ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

या चारही योजनांची सविस्तर माहिती, सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा –

Fake Covid-19 Vaccination: मुंबईनंतर ठाण्यातही बनावट लसीकरण; लाखोंचा भुर्दंड

First Published on: June 26, 2021 12:36 AM
Exit mobile version