Nmmc garden : दिव्यांगांच्या उद्यानाबाबत पालिका ‘संवेदना’ हिन ; मनसे आक्रमक

Nmmc garden : दिव्यांगांच्या उद्यानाबाबत पालिका ‘संवेदना’ हिन ; मनसे आक्रमक

दिव्यांगांसाठी संवेदना उद्यान सानपाडा सेक्टर १०

नवी मुंबई :  उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात सानपाडा सेक्टर १० येथे महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी संवेदना उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.राज्यातील पहिलाच उपक्रम म्हणून नावाजलेल्या या उद्यानाला सध्या अवकळा आली आहे. दिव्यांगांच्या या उद्यानाची अवस्था पाहता त्याला जबाबदार असणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे. दिव्यांगाच्या संवेदना उद्यानाची निर्मिती ही स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर करण्यात आली होती.जॉगिंग ट्रॅक, योग साधना केंद्र, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, वाळूचा हौद, आकर्षक खेळणी, बैठक, विद्युत व्यवस्था, हिरवळ, विविध झाडे-झुडपे, सेल्फी फ्रेम, हनिकोंब स्ट्रक्चर, छोटे कारंजे, बुद्धिबळ चौकट आणि सभोवताली ५१२ मीटर लांबीचा सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक आदी अत्याधुनिक सुविधा असल्याने या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे नागरिकांनीही स्वागत केले होते. मात्र अवघ्या काही वर्षात महापालिका अधिकारी, ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. उद्यानातील लोखंडी फलक, लहान मुलांची तुटलेली खेळणी पडली आहे. उद्यानातील कारंजे बंद असून पाण्या अभावी कारंजाचे हौद ओस पडले आहेत. सुकलेल्या झाडांचे ढिग साचले आहेत तर दिवे तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छता गृहात खराब झालेले नळ, तुटलेले शौच भांडे अशी विदारक अवस्था निर्माण झाली आहे. हा प्रकार पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. उद्यानाची दयनिय अवस्था झालेली असतानाही देखभाल दुरुस्तीचे काम पाहणार्‍या ठेकेदारांची बिले मात्र पालिकेकडून वेळेत दिली जात आहेत.सदर ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून ठेकेदाराच्या बिलाची चौकशी पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी करावी.पालिकेने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास’मनसे स्टाईल’ ने जनआंदोलन करावे लागेल.                                                                                             -योगेश शेटे, (सानपाडा विभाग अध्यक्ष, मनसे) संवेदना उद्यानातील मोडकळले साहित्य काढून त्या ठिकाणी नव्याने साहित्य बसविण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहे. येत्या दोन ते दिवसात उद्यानात नवे साहित्य बसविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.                  -दिलीप नेरकर, उपायुक्त उद्यान विभाग

First Published on: April 23, 2024 8:14 PM
Exit mobile version