पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत; आमदार नाईक यांची पालिका प्रशासनास सूचना

पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत; आमदार नाईक यांची पालिका प्रशासनास सूचना

बेलापूर : शहरामध्ये सुरू असलेली सर्व पावसाळापूर्व कामे नियोजनपूर्वक वेळेत पूर्ण करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. आमदार नाईक यांची बुधवारी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये विशेषत्वाने
पावसाळापूर्व करावयाची कामे, नवी मुंबईकरांना भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई, महापालिकेच्या आस्थापना वरील विविध संवर्गातील कंत्राटी तसेच ठोक व रोख मानधनावरील कर्मचारी यांच्या मागण्या, नवी मुंबई परिवहन सेवा कर्मचार्‍यांच्या मागण्या, शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास या व अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीस माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण होत नाहीत…
पावसाळापूर्व कामांबद्दल पालिका प्रशासनाला सूचना करताना आमदार नाईक यांनी ही कामे नियोजित पद्धतीने वेळेवर पूर्ण करण्यास सांगितले. अनेक वेळा वस्तूस्थिती अशी असते की पावसाळा सुरू झाला तरी देखील ही कामे सुरूच असतात. परिणामी नागरिकांचे हाल होत असतात. रस्त्यांची कामे, नालेसफाई, मलनिसारण वाहिन्यांची आणि गटार बांधणीची कामे पावसाळा सुरू होण्या अगोदर पूर्ण करावीत. पावसाळ्यात उद्भवणार्‍या साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा. अतिवृष्टीच्या आणि पावसाळ्यातील अन्य संकटकालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी यंत्रणा चौकस ठेवावी. निवारा शेड तसेच अन्नधान्याची उपलब्धता यांची तरतूद करावी अशा मौलिक सूचना लोकनेते नाईक यांनी या बैठकीत केल्या.
संदीप नाईक यांनी शहरातील भुयारी मार्गामध्ये पावसाळ्यात साठणारे पाणी बाहेर काढण्यासाठी आवश्यक पंप त्यासाठी लागणारे इंधन हे पंप चालवणारे कर्मचारी अशी सर्व व्यवस्था तयार ठेवण्याची सूचना केली. ज्या ठिकाणी हायटाईड आहे त्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

नवी मुंबईच्या हक्काचा पाणी कोटा मिळवा…
नवी मुंबईतील पाणीटंचाईवर लोकनेते आमदार नाईक यांनी अतिशय आक्रमकपणे जनतेच्या भावना मांडल्या. प्रशासकीय काळामध्ये शहरात पाण्याची समस्या वाढली. नवी मुंबईमध्ये पाणीटंचाईचे सबळ कारण नाही. शहरासाठी स्वतंत्र असे मोरबे धरण आहे, केवळ काही अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो आहे, असा आरोप त्यांनी केला. मोरबे धरणाचे पाणी पनवेलच्या काही ग्रामीण भागामध्ये वळविण्यात येत असल्याचा गौप्यस्फोट केला. संदीप नाईक यांनी बारवी आणि हेटवणे धरणातून नवी मुंबईला मिळणारा पाणी कोटा पुरेपूर काटेकोरपणे उपलब्ध करून घेण्याची मागणी यावेळी केली. त्याचबरोबर शहरातील सर्व भागात समान पाण्याचे वितरण झाले पाहिजे , अशी सूचना केली. नवी मुंबईकरांना तहानलेले ठेवून जर त्यांच्या वाट्याचे पाणी कोणी अन्यत्र वळवणार असेल तर हे सहन करणार नाही असे स्पष्ट करून शहरातील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर करा अन्यथा लोकहितासाठी महापालिकेवर मोर्चा आणण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा देखील आमदार नाईक यांनी दिला. आयुक्त नार्वेकर यांनी पाणीटंचाई प्रश्नावर गांभीर्याने चौकशी करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेतील कंत्राटी शिक्षकांना वेतन वाढ देऊन त्यांची सेवा मुदत वाढविण्याची सूचना केली.

बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय…
दिघा यादव नगर येथील शाळेची अपूर्ण इमारत लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी शाळा सुरू करणे
महापालिकेच्या सर्व बालवाड्यांमधून इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी सुरू करणे, ऐरोली येथील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयामध्ये अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची नेमणूक करणे, वाशी सेक्टर १४ येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय इमारतीमध्ये वाचनालय ,व्यायाम शाळा ,सामाजिक सभागृह इत्यादी सुविधांचे निर्माण करून या इमारतीचे लोकार्पण करणे, कोपरी गाव पाम बीच मार्गावरील क्सेसरीज दुकानांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करणे
घनसोली खदान तलावाचे सौंदर्यकरण करणे, घणसोली येथील रस्ते सिडकोच्या अगोदरच्या आराखड्यानुसार बांधणे, दिघा विभागात पार्किंगची सुविधा निर्माण करणे. एच वॉर्ड इमारतीची पुनर्बांधणी करणे, ऐरोली येथील बंद भाजी मार्केट सुरू करणे, बंद पडलेल्या ऑर्चिड शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेणे, सर्व विभागांमध्ये पावसाळापूर्व कामे हाती घेणे, दिवाळे गावातील उर्वरित मासे व्यवसायिकांना मार्केटमध्ये सामावून घेणे
करावे मध्ये ड्रेनेज लाईनची कामे हाती घेणे,न्हावाशेवा पुलामुळे वाशीतील मच्छीमारांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी त्यांना नुकसान भरपाई देणे.

First Published on: May 3, 2023 9:12 PM
Exit mobile version