गद्दारांना धडा शिकवू; शिवगर्जना मेळाव्यात शिवसैनिकांचा निर्धार

गद्दारांना धडा शिकवू; शिवगर्जना मेळाव्यात शिवसैनिकांचा निर्धार

नवी मुंबई: शिवसेनेने अनेक संकटे झेलली आहेत.संघर्षातून शिवसेना घडली हा इतिहास आहे. आता ४० आमदार गद्दारी करुन गेले असले तरी तमाम शिवसैनिक उध्दव ठाकरेंच्या पाठीशी आहे. ज्या प्रमाणे कोंढाणा सर केलेले नरवीर तानाजी मालुसरे आणि घोडखिंडीत शत्रुला रोखून धरणारे बाजीप्रभु देशपांडे जिंकेपर्यंत लढले त्याप्रमाणणे लढून गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचे नाही, असा निर्धार नेरुळ येथे पार पडलेल्या शिवगर्जना मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी केला.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवगर्जना अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नेरुळ येथील सेक्टर ९ मधील आहिल्याबाई होळकर सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते भास्कर जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाण्याचे खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नवी मुंबईचे संपर्क प्रमुख आप्पा पराडकर, शहरप्रमुख विजय माने, माजी नगरसेवक एम.के.मढवी, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, रंजना नेवाळकर, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी आदी उपस्थित होते.
सत्तेसाठी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्या मिंधे गटाबारोबर फक्त कॉन्ट्रक्टर गेले आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारे निष्ठावंत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मागे गंभीरपणे उभा आहेत, असे खा.राजन विचारे म्हणाले.
जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी उद्धव ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत पोहचून हा लढा जिंकण्यासाठी सर्व अडचणी बाजूला सारून कामाला लागा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

सामान्य जनेतेच्या मनात ईडी सरकारच्या विरोधात चिड आहे. सरकार शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहे, किसन क्रेडीट कार्ड, उज्वला गॅस योजना कुठे गेल्या? केंद्र आणि राज्यात उल्लू बनवणारे सरकार आहे.
– अंबादास दानवे,
विरोधी पक्षनेते, विधान परिषद

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांनी लढा देऊन मुंबईला घडविले आहे. मुुंबई महानगरपालिकेत असणार्‍या ९९ हजार कोटींच्या ठेवींवर भारतीय जनता पक्षाच्या बोक्यांचे लक्ष आहे. शिवसेनेतून गद्दार गेल्याने ठाणे जिल्ह्यात खरी शिवसेना एकरुप झाली आहे. धर्मवीर आनंद दिघेंचे खरे वारसदा राजन विचारे आहेत.
– भास्कर जाधव,
शिवसेना नेते, आमदार

First Published on: March 1, 2023 9:39 PM
Exit mobile version