संक्रांतीचा गोडवा वाढणार; तीळ, साखर, गूळ यांच्या भावात घसरण

संक्रांतीचा गोडवा वाढणार; तीळ, साखर, गूळ यांच्या भावात घसरण

नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत या सणाला गोड धोड म्हणजेच तीळगूळ देण्याची व खाण्याची परंपरा असून ’तीळगूळ घ्या आणि गोडगोड बोला’ म्हणत परस्परांतील स्नेह वृद्धिंगत करण्याचा संक्रांतीचा सण जवळ आला आहे. तीळ, गूळ आणि साखर यांचे एकत्रित मिश्रण करून तीळगूळ सर्वांना वाटप केले जाते. याकरता विशेषत: गृहिणीची मोठ्या प्रमाणात धडपड सुरु असते. यावर्षी देखील बाजारपेठेत तीळगूळाचे साहित्य खरेदी करण्याची रेलचेल सुरु झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दोन्ही वस्तूंचे दर कमी असल्याने संक्रातीचा गोडवा यावर्षी वाढणार आहे.

तीळगूळासाठी लागणारे तीळ, गूळ आणि साखर आदींचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे.
– नरेंद्र शिंदे, व्यापारी

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा सण सर्वत्र परिवर्तन, उत्साह आणि आनंदाची पेरणी करून जातो. सौर कालगणनेशी संबंधित या भारतीय सणात तीळगूळाचे महत्त्व मोठे आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरा, ऊस, बोरं, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. घरोघरी वाणासोबतच तीळगूळ देण्याची प्रथा आहे. उत्तरायणापासून दिवस तीळ-तीळ वाढतो, म्हणजेच ऊन वाढत जाते, अशीदेखील आख्यायिका आहे. असा हा गोडवा देणारा सण यंदा अधिक मधूर होणार आहे. तीळ आणि गुळाचे दर आटोक्यात असून मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. आजमितीस तीळ १४५ ते १६० रुपये प्रती किलो, गूळ ३५ ते ५० रुपये प्रती किलो आणि साखर ३३ ते ४२ रुपये प्रती असा भाव आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ५ ते १० रुपयांचा फरक पडलेला आहे.

तीळगूळ करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दरवर्षी काही प्रमाणात रेडिमेडदेखील तीळगूळ खरेदी करतो. मात्र यावर्षी पूर्णपणे घरीच तीळगूळ बनवणार आहोत. तीळ, साखर व गूळांचे दर कमी झालेले आहे. त्यामुळे दिलासा मिळालेला आहे.
– जागृती मोकाशी, गृहिणी

हेही वाचा –

Mumbai Coronavirus : इतर राज्यांप्रमाणे मुंबईत घाईत निर्णय घेणार नाही; महापौर पेडणेकरांचा सावध पवित्रा

First Published on: January 11, 2022 3:47 PM
Exit mobile version