नाशिक ते बेळगाव अवघ्या तासाभरात

नाशिक ते बेळगाव अवघ्या तासाभरात

नाशिकमधून विमानसेवांचा विस्तार होत असून आता २५ जानेवारीपासून स्टार एअरची नाशिक ते बेळगाव विमानसेवा सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीच्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त ही सेवा सुरू करण्यात येत असून या सेवेमुळे तासाभरात हा प्रवास करता येणार आहे. आठवड्यातून तीन दिवस ही सेवा दिली जाणार आहे.

नाशिक ते बेळगावी दरम्यानच्या थेट विमानसेवेमुळे ‘प्रादेशिक एअरोस्पेस’ क्षेत्राला चालना मिळणार आहे कारण बेळगावी हे भारतातील पहिले खासगी ‘एअरोस्पेस एसईझेड’ आहे. भारताचे संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचे केंद्रस्थान असलेले बेळगावी हे नाशिकसह जगभरातील एअरोस्पेस क्षेत्राच्या महत्तवपूर्ण अभियांत्रिकी गरजांची पूर्तता करते. नाशिक आणि बेळगावी हे अंतर साधारणपणे ५८० किलोमीटरचे असून ११-१२ तासांचा प्रवास आता या विमानसेवेमुळे आता फक्त एक तासात पूर्ण करता येणार आहे. नाशिककरांसाठी या विमान सेवेमुळे आता उत्तर कर्नाटक (बेळगावी, हुबळी, धारवाड, विजापूर), दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी) तसेच गोवा येथे प्रवास करणे अत्यंत सोयीचे होणार आहे.

२५ जानेवारी रोजी या सेवेचे उद्घाटन होणार असून, यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेषगिरी राव उपस्थित राहणार आहेत. नाशिक ते बेळगाव दरम्यान आठवड्यातून तीन वेळा म्हणजेच सोमवार, शुक्रवार आणि रविवार ही थेट विमानसेवा दिली जाईल. उद्घाटनानिमित्त व आरसीएस-उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा मर्यादित कालावधीसाठी फक्त १९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

अब्जावधी डॉलर्सच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी नाशिक अत्यंत महत्त्वाचे असल्याने नाशिकहून उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, ज्यामुळे औद्योगिक उपक्रमांना नक्कीच मदत होईल. – संजय घोडावत, अध्यक्ष, स्टार एअर

स्टार एअर दोन प्रमुख भारतीय शहरांना जोडणार असल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी नक्कीच वाढेल आणि दोन्ही राज्यांतील व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल. – श्रेणिक घोडावत, संचालक, स्टार एअर

First Published on: January 21, 2021 5:58 PM
Exit mobile version