वाडा तालुक्यातील ९० टक्के विहीरी कोरड्या

वाडा तालुक्यातील ९० टक्के विहीरी कोरड्या

वाडा :उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. अति उष्णतेने दरवर्षी पाण्याची पातळी खालावते. यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. हा अनुभव गाठीला असल्याने विंधन विहिरीची खोली वाढविण्याची मागणी ग्रामस्थांची आहे.ग्रामीण व आदिवासी डोंगराळ भागातील गाव, खेडी ,पाडे ,वस्त्या उंच सकल भागात वसलेल्या आहेत. सपाटीवर वसलेल्या व नदी नाल्यांच्या किनार्‍यावर वसलेल्या गावपाड्यात पाण्याची पातळी आठ-दहा फुटांवर असते. तिथे विंधन विहिरीला भरपूर पाणी लागते. उंच भागात गाव असेल तर पाण्याची पातळी खोलवर असते. शासकीय नियमानुसार विंधन विहिरींना फक्त दोनशे फूट मर्यादा असल्याने सर्व भागात फक्त दोनशे फूट विंधन विहिरी खोदल्या जातात ९० टक्के विंधन विहिरी कोरड्या निघतात. एक विंधन विहिर खोदकामासाठी दोनशे फूट खोलीला शासनाचा खर्च ७० हजार रुपये आहे. खेड्यात तीन-चार विंधन विहिरी आहेत. तर मोठ्या गावातून विंधन विहिरीचे प्रमाण जास्त आहे.

१८७ गाव व पाचशेच्या वर पाडे असलेल्या वाडा तालुक्यात विंधन विहिरीचे प्रमाण हजारोंच्या संख्येने आहे. यातील केवळ दोनशे फूट खोलीपर्यंत असल्याने कोरड्या झालेल्या विंधन विहिरींचे प्रमाण ९० टक्के असल्याचे अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सांगितले. शासकीय योजनांची फक्त अंमलबजावणी करणे एवढेच काम अधिकारी करत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च कोरड्या विंधन विहिरीत जातो. शासकीय भूजल तज्ञ यांनी दाखवलेल्या जागेवर मारलेल्या बोअर कोरड्या गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे विंधन विहिरींची २०० फुटांची खोलीची मर्यादा आता ३००ते ३५० फूट करावी व खर्चात वाढ करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

First Published on: May 14, 2023 9:13 PM
Exit mobile version