अभियंता, जि.प.च्या दहा शिक्षकांवर गुन्हा दाखल

अभियंता, जि.प.च्या दहा शिक्षकांवर गुन्हा दाखल

पालघर : तालुक्यातील रविवारी झालेल्या ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात टाळाटाळ करून अनुपस्थित राहिल्याने एका अभियंता व जिल्हापरिषदेच्या दहा शिक्षकांवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशाने पालघरचे निवासी नायब तहसीलदार यांच्या तक्रारीनंतर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पालघर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पालघर तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडल्या. या निवडणूक कार्यक्रमासाठी जिल्हापरिषदेच्या शिक्षक वर्ग व अभियंता यांची सेवा घेण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पडावी, यासाठी या अभियंता व शिक्षकांना निवडणूक आयोगाकडून प्रशिक्षणही देण्यात आले होते. परंतु पालघरच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता एल. आर. सोनग्रा आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक पराग प्रदीर संखे, प्रीती प्रशांत बोकंद, शितल शंशिकात संखे, प्रतिभा प्रमोद संखे, प्रेरणा प्रशांत राणे, सुजाता विपीन वाडे, विलास गणपत तुंबडा, स्मिता सुरेश तरवाल, प्रमोदीनी हेमाकांत पाटील आणि विनीता विजय संखे यांच्यावर निवडणूक कार्यक्रमात टाळाटाळ करून अनुपस्थित राहिल्याने पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशाने पालघरचे निवासी नायब तहसीलदार केशव तरंगे यांच्या तक्रारींवर पालघर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पालघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहे.

First Published on: December 19, 2022 9:58 PM
Exit mobile version