मोहन संखे स्टिंग ऑपरेशन : अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांची उचलबांगडी निश्चित

मोहन संखे स्टिंग ऑपरेशन : अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांची उचलबांगडी निश्चित

Vasai Virar Municipal Corporation

अनधिकृत बांधकामांना अभय देऊन वसुल्या होत असल्याच्या तक्रारी मंत्रालयात पोचल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांची उचलबांगडी होणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. मात्र, वादग्रस्त ठेका इंजिनियर स्वरुप खानोलकर आणि युवराज पाटील यांना अद्याप अभय असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पेल्हार विभागाचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील, ठेका अभियंता युवराज पाटील, स्वरूप खानोलकर अनधिकृत बांधकामांतून लाखो-करोडोंच्या आर्थिक वसुल्या करून त्याचे हप्ते शिवसेना, राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांपर्यंत पोहोचवत असल्याचा गौप्यस्फोट एका स्टिंग ऑपरेशनदरम्यान केला होता.

संखेंच्या गौप्यस्फोटानंतर मनसे, प्रहार जनशक्ती, काँग्रेस या राजकीय पक्षांनी अति.आयुक्त आशिष पाटील यांच्यासह ठेका अभियंता युवराज पाटील, स्वरूप खानोलकर यांच्यावर कारवाईची मागणी मंत्रालयस्तरापर्यंत केली आहे. या मागणीला अखेर बळ येत असल्याचे दिसत असून अतिरीक्त आयुक्त आशिष पाटील यांची कोणत्याही क्षणी उचलबांगडी होण्याचे संकेत मिळत आहेत. तशा हालचालीच मंत्रालयत सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यातच आशिष पाटील गेल्या महिन्याभरापासून रजेवर असल्याने त्यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे.

गौप्यस्फोटानंतर संखेंची उचलबांगडी करून त्यांची मालमत्ता विभागात बदली करण्यात आली आहे. संखेंनी केलेल्या आरोपांनंतर प्रहार जनशक्ती पक्ष आणि काँग्रेस यांनी मंत्रालयस्तरापर्यंत तक्रार करून अतिरीक्त आयुक्त आशिष पाटील, ठेका अभियंता युवराज पाटील व ठेका अभियंता स्वरूप खानोलकर यांची कसून चौकशी करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान, मार्च महिन्यात निलेश कोरे या ठेका अभियत्याला एका अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी लाच घेताना अँटीकरप्शनने पकडल्यानंतर आशिष पाटील संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून पाटील रजेवरच गेले आहेत. संखेंच्या स्टिंग ऑपरेशननंतर पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा –

मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, शरद पवांराची स्पष्टोक्ती

First Published on: July 15, 2021 12:56 AM
Exit mobile version