खोडाळ्यात मान्सूनपूर्व कामांची लगबग; घरांची डागडुजी सुरु

खोडाळ्यात मान्सूनपूर्व कामांची लगबग; घरांची डागडुजी सुरु

मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लास्टिक ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामाची घाई बळीराजा करत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जून ते ५ जून दरम्यान मान्सुन केरळपर्यंत पोहोचून पुढे सरकणार आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासह देशात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय वेधशाळेने दर्शवल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मान्सूनपूर्व कामांची चढाओढ सुरू झाली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी मातीची घरे छतावर तसेच जनावरांचा चारा खराब होऊ नये, म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करतात. चार-पाच दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातील बहुतेक भागांना तौक्ती चक्रीवादळामुळे सोसायट्याच्या वारा, वादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिल्याने नागरिकांमध्ये कामांची चढाओढ सुरू झाली आहे. घरांवर आच्छादन टाकण्यासाठी बाजारात प्लास्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक येत आहेत.

पाऊस येण्यापूर्वी वेळेत घरांची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. डागडुजीच्या कामांना विलंब न करणे सोईस्कर ठरेल. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य करत आहे. तसेच पावसाळ्यात जनावरांचा चारा भिजू नये, म्हणून जनावरांच्या गोठ्याची व्यवस्था ताडपत्रीच्या सहाय्याने डागडुजी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम नागरिकांनी घेतले असून छतावरील गळत असलेल्या ठिकाणांवर प्लास्टिकचे आच्छादन ठेवण्याचे जोरदार काम चालू आहे. पावसाळ्यात कांदा, मिरची साठवणूक करण्यासाठी ताळेबंदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येते.

पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्याने खोडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आपापल्या राहत्या घरी गुरांसाठी लागणारा चारा, गुरांचे गोठे, गवऱ्या, सरपण आदी. गोष्टींची सोय करण्याची लगबग मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. तसेच छत दुरुस्ती, घरांमध्ये ओलावा येऊ नये, म्हणून पडवी, झडपी बांधण्याला वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद आहेत. त्यात काही वेळ सूट मिळत असून बाजारपेठ सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे दुरुस्ती कामांना गती आली आहे.

हेही वाचा –

आबांनी आडवी केलेली बाटली, सरकारने शेवटी रिचवलीच – चित्रा वाघ

First Published on: May 27, 2021 11:45 PM
Exit mobile version