सहाय्यक अभियंत्यासह अन्य कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

सहाय्यक अभियंत्यासह अन्य कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

सफाळे : पालघर तालुक्यातील महावितरणच्या सफाळे विभागांतर्गतच्या रामबाग शाखेमार्फत वीजचोरी शोध मोहीम राबवताना माकुणसार, प्लॉटवाडी भागात सहाय्यक अभियंतासह अन्य कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करणे, गणवेश फाडणे, अंगावर धावून जाणे असा गंभीर प्रकार नुकताच घडला आहे. या संतापजनक प्रकरणानंतर सफाळे पोलीस स्टेशनमध्ये वीज ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या सफाळे विभागांतर्गत येणार्‍या रामबाग शाखेचे सहाय्यक अभियंता तात्यासो रामचंद्र जगताप, कनिष्ठ अभियंता सायली कांबळे, सहाय्यक अभियंता निखिल बिरनाळे आणि जी वेंकटेशन, वरिष्ठ तंत्रज्ञ अविनाश पाटील, रोहित पाटील, अल्पेश वर्तक, संदीप वडेर, रवींद्र चिपाट, सचिन भोईर या सर्वांचे पथक रामबाग, माकूणसार, कपासे परिसरामध्ये विविध चोरी मोहीम राबवित होते. यादरम्यान माकुणसार प्लॉटवाडी येथील प्रदीप विठ्ठल भोईर यांच्या घरासमोर हे पथक पोहोचले. मीटरची तपासणी सायली कांबळे यांनी केली. तसेच त्यांनी घरामध्ये उपस्थित असलेल्या प्रदीप भोईर यांची पत्नी व मुलाकडे विजेच्या बिलाची मागणी केली. बिल आणल्यानंतर बिलाची पाहणी केली असता, बिल कमी प्रमाणात असल्याने वीज चोरी असल्याची शंका निर्माण झाली. त्यावेळी सायली कांबळे यांनी प्रदीप भोईर यांच्या पत्नीस घरामध्ये पाहणी करायची असल्याने आत जाण्याची परवानगी घेऊन सायली कांबळे यांच्यासह सहाय्यक अभियंता व्यंकटेशन आणि अल्पेष वर्तक हे घरामध्ये गेले.

घरात पाहणी केली असता, जिन्याच्या खाली व पहिल्या मजल्यावर लाल पिवळ्या रंगाचे फोर पोल स्विच आढळले. त्यावरून या पथकाला घरामध्ये वीज चोरी होत असल्याची पक्की खात्री झाली. विज चोरी उघड झाल्यानंतर प्रदीप भोईर यांच्या पत्नीने सदर पथकाला घरामधून बाहेर जाण्यास सांगितले. पथकाने बाहेर जाऊन तत्काळ पोलिसांना ११२ वर फोन करून सदर प्रकारची माहिती दिली. दरम्यान काहीच वेळात प्रदीप भोईर घरी आले असता पथकाने त्यांना वीजचोरीबाबत कल्पना देवून पुन्हा वीजचोरी बाबत परिपूर्ण माहिती घेण्यासाठी घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी वीजचोरी उघडकीस येत आहे, असे लक्षात आल्याने प्रदीप भोईर यांनी सहाय्यक अभियंता तात्यासो रामचंद्र जगताप यांच्या हाताला पकडून घराबाहेर काढले. तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ अल्पेश वर्तक यांनी धक्काबुक्की करून त्यांचा गणवेश फाडून त्यांना घराबाहेर काढले. तसेच पहिल्या माळ्यावरील कनिष्ठ अभियंता सायली कांबळे आणि अन्य कर्मचार्‍यांनाही त्यांनी घराबाहेर काढले. अखेर सफाळे पोलिसांच्या मदतीने पथकाने विजचोरीची कारवाई पूर्ण केली. त्यानंतर सहाय्यक अभियंता तात्यासो रामचंद्र जगताप यांनी सफाळे पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप भोईर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कलम ३५३ सरकारी कामात अडथळा आणणे व अन्य दोन कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: January 19, 2023 9:23 PM
Exit mobile version