पालघर जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारीला बंदी

पालघर जिल्ह्यात १ जूनपासून मासेमारीला बंदी

वसईः राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब आणि वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्तहानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकास मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनार्‍यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणार्‍या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मसेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू राहतील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात ( सागरी किनार्‍यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास, केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसवलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिद्ध आहे, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशात म्हटले आहे.

First Published on: May 26, 2023 10:06 PM
Exit mobile version