उचावली गावात उच्छाद,चौघांचा घेतला चावा

उचावली गावात उच्छाद,चौघांचा घेतला चावा

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील उचावली गावात पिसाळलेल्या कुत्र्याने चार वर्षांच्या मुलीसह चौघांवर झडप टाकून चावा घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली असून यातील जखमींना सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका महिलेला जबरदस्त चावा मारल्याने पायाची नस फाटली असून सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सफाळेसह परिसरातील कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये कुत्रे येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांवर भुंकणे, अंगावर येणे, दुचाकी गाडी चालवत असताना धावून येणे असे प्रकार रोजच घडत असतात. त्यामुळे कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाले आहे. असाच प्रकार उचावली गावात घडला आहे. अंगणात खेळत असलेल्या रिया रणजित लहांगे (४) हिच्यासह गावातील विक्रांत विलास कामडी (१६), बबन जाण्या पराड (६५) व शांती झिपर घाटाळ (६०) अशा चौघांवर पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालून चावे घेतले. यात चौघे जखमी झाल्याने सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पालघर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यातील शांती झिपर घाटाळ या साठ वर्षीय महिलेची पायाची नस फाटल्यामुळे पुढील उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

First Published on: February 23, 2023 8:14 PM
Exit mobile version