मध्य वैतरणा धरणाच्या लगतच स्फोट केले

मध्य वैतरणा धरणाच्या लगतच स्फोट केले

ज्ञानेश्वर पालवे , मोखाडा: मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी २०१४ साली मोखाडा हद्दीत मध्यवैतरणा प्रकल्पाची निर्मिती करून धरण बांधण्यात आले. याच धरणावर विद्युत प्रकल्पही होणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचेही काम सुरू क्ररण्यात आले आहे. मात्र धरणाच्या पायथ्याशी खोदकाम करताना सदर कामाची उरक व्हावी, म्हणून चक्क सुरूंग लावून स्फोट घडवल्याने या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास जी आर्थिक मनुष्यहानी होणार आहे, याला जबाबदार कोण असा सवाल आता निर्माण होत आहे.
धरण बांधकामापासून काहिच अंतरावर या विद्युत प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. यामुळे यासाठी कोणतेही खोदकाम करताना मशीनरीच्या सहाय्यानेच करावे असे नियम आहेत. याशिवाय यासाठी तहसिलदार मोखाडा वनविभाग यांचीही परवानगी आवश्यक आहे. मात्र याठिकाणी आजवर १० ते १२ वेळा ब्लास्ट झाले असून यासाठी किमान २ हजार स्फोटकांचा उपयोग झाल्याचा अंदाज आहे. यावरून हा किती भयंकर प्रकार आहे याचा अंदाज येतो आहे .मात्र धरणक्षेत्राच्या परिसरात पाखरालाही परवानगी नाकारणारे अधिकारी,तसेच कित्येक गावांना रस्ता बनविण्यासाठी आडकाठी करणारा वनविभाग आणि एक ट्रॉली रेतीही घेवू न देणारा महसूल विभाग मात्र एवढे मोठे स्फोट आणि खोदकाम विनापरवानगी होत असताना झोपतो कसा? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शेजारच्या अजनुप दापुर गावचे सरपंच शांताराम भगत आणि सदस्य अनंता वारे यांनी सांगितले की, या स्फोटा दरम्यान आम्हाला दोन दोन तास येथून प्रवास नाकारला जायचा. आम्हाला कसलीही माहिती दिली जात नव्हती.

प्रतिक्रिया

” या भागातील स्फोटामुळे आसपासच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. याशिवाय मी वनविभाग आणि तहसीलदारांशी बोललो, तर कसलीही परवानगी यासाठी देण्यात आलेली नाही. यामुळे घरकुल बांधकामासाठी थोडीशी रेती वापरली तर कारवाई करणारा महसूल विभाग आणि दोन चार फाट्या गोळा केले तर आमच्या आदिवासींवर कारवाई करणारा वनविभाग या ठेकेदारावर कारवाई करणार आहे का हा प्रश्न आहे.

– प्रदिप वाघ
उपसभापती,पं. स. मोखाडा

First Published on: January 24, 2023 9:06 PM
Exit mobile version