पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या १९ मेपासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. हवामान खात्याने १९ मेपासून अखेरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यातील चालू उन्हाळी हंगामात भात, भुईमुग, भाजीपाला, पिके तसेच फळपिकांची काढणी अजून बाकी असल्याने त्या अनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

उन्हाळी भाताची १५ मे पूर्वी काढणी करावी. जेणेकरुन दोन वाळवणी व झोडणी करुन भाताची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करता येईल. १९ मेनंतर तयार होणाऱ्या भाताचे उचित किडरोग व्यवस्थापन करावे. भाताच्या पेढ्याची (पावली) सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भुईमुगाच्या शेंगावरील शिरा स्पष्ट दिसू लागल्यास तसेच टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागल्यावर दाणे पूर्ण भरला जाऊन चांगला रंग आल्यावर काढणी करावी. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन  शेंगा काढाव्यात. त्या शेंगा पाच दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्यात. आंबा वाढीच्या अवस्थेतील आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. नियंत्रणसाठी कार्बेडाझिम (१२ टक्के) कन्कोझेल (६३ टक्के) संयुक्त बुरशीनाशकाची १० ग्राम प्रती १० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आल्या आहेत.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. सुकवणीसाठी ठेवलेल्या मच्छी गोळा करून सुरक्षितस्थळी त्याची साठवण करावी. मिठागरात साठवलेले मीठ ताडपत्री आणि झावळ्याच्या साहय्याने सुरक्षित जागी झाकून ठेवावे, असेही मीठ उत्पादकांना कळवण्यात आले आहे.

हेही वाचा –

राणा दाम्पत्याला मिडीयाला बाईट देणं पडणार महाग, जामीन होणार रद्द

First Published on: May 8, 2022 8:10 PM
Exit mobile version