खंडित होणार्‍या वीज पुरवठ्याने सफाळ्यातील नागरिक हैराण

खंडित होणार्‍या वीज पुरवठ्याने सफाळ्यातील नागरिक हैराण

सफाळे: एप्रिल-मे सुरु झाला की उकड्यासोबत सातत्याने वीज खंडित होण्याचे प्रकार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू झाला असून वीजपुरवठा अचानक खंडित होण्याच्या प्रकारांमुळे पंखे व कूलर बंद पडल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. 33 केव्ही वीज उपकेंद्रातील तांत्रिक बिघाड व वीजपुरवठ्यात अडचणी येत असल्याचे ’महावितरण’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने तापमान 40 डिग्रीपर्यंत गेले आहे. यातच पंखे, कूलर व एसी यांचा वापर वाढला आहे.

दिवसभर वीजपुरवठा बंद पडण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. ’महावितरण’कडून दुरुस्ती कामासाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे ग्राहकांना एक ते दोन दिवस मोबाइलवर ’एसएमएस’द्वारे कळवले जाते. परंतु, वीजपुरवठा बंद राहणार असल्याबाबतचा कोणताही संदेश नसताना अचानक वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. सफाळा,पारगाव, नवघर, आगरवाडी, केळवा, रामबाग, एडवण भागातील वीजपुरवठा नेहमी दुरुस्तीच्या कारणाने बंद केला जातो. उन्हाळ्याच्या कालावधीत अधिक विजेची मागणी असली तरी उकड्याने हैराण असणार्‍या जनतेसाठी विजेची गरज महत्त्वाची आहे. याबाबत महावितरणने चांगली सेवा द्यावी, अशी नागरिकांनी अपेक्षा केली आहे.

First Published on: April 19, 2023 9:35 PM
Exit mobile version