मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील स्विमिंग पुलाचे दिवाळीत लोकार्पण

मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील स्विमिंग पुलाचे दिवाळीत लोकार्पण

मीरा भाईंदर महापालिका हद्दीत हायवेजवळ ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल बांधण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. यावर्षी दिवाळीत हा स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुला केला जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही वर्षांपूर्वी भाईंदरच्या नवघर मैदानात कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी मीरा भाईंदरमधील तरुण, नागरिकांसाठी स्विमिंग पूल बांधला पाहिजे, असे आदेश त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना दिले होते. त्या आदेशाचे पालन करत सरनाईक यांनी तरणतलाव बांधण्यासाठी जागेचा शोध घेऊन याकामाचा पाठपुरावा सुरु केला होता. मीरा भाईंदर शहरात, विशेषतः हाय वे पट्ट्यातील नागरिकांसाठी स्विमिंग पूल असावा यादृष्टीने हायवे पट्ट्यातच आमदार सरनाईक यांनी स्विमिंग पूलसाठी जागा निश्चित करण्यास प्राधान्य दिले.

हायवेजवळ मौजे महाजनवाडी येथे लोढा बिल्डरचा बांधकाम प्रकल्प आहे. त्या प्रकल्पातील सुविधा भूखंड जनतेला मिळावा यासाठी सरनाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. हा सुविधा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यासाठी त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानंतर सुविधा भूखंड जनतेसाठी मिळाला. मीरा भाईंदर महापालिकेच्या ताब्यात हा सुविधा भूखंड आल्यानंतर तेथे तरण तलाव बांधण्याचे काम मंजूर व्हावे म्हणून आमदारांनी महापालिका आयुक्तांकडे सतत पाठपुरावा केला. या सुविधा क्षेत्राच्या भूखंडात स्विमिंग पूल बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. मात्र विविध अडचणींमुळे हे काम आतापर्यंत रखडले होते.

याठिकाणी मुख्य स्विमिंग पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर चेंजिंग रूम, ऍक्टिव्हिटी रूमची एक मजली इमारत बांधून तयार आहे. लहान मुलांसाठी छोटा स्विमिंग पूलही येथे असणार आहे. जे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी येतील त्यांना कपडे ठेवण्यासाठी व चेंज करण्यासाठी रूम , लॉकर , टॉयलेट याचीही सोय आहे. येथे बांधून झालेल्या एक मजली इमारतीत अंतर्गत सजावट, फर्निचर व इतर कामे होणे बाकी आहे. रंगकाम, शेड व इतर कामे होणार असून ही कामे लवकरात लवकर महापालिकेने पूर्ण करावीत व दिवाळीत या स्विमिंग पुलाचे उद्घाटन करावे, अशा सूचना आमदार सरनाईक यांनी केल्या. हे काम नक्कीच पूर्ण करून दिवाळीत स्विमिंग पुलाचे उद्घाटन होऊन जनतेसाठी स्विमिंग पूल सुरु होईल, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी स्पष्ट केले.

पालिकेनेच स्विमिंग पूल चालवावा

बांधून पूर्ण होत आलेला हा स्विमिंग पूल दिवाळीत सुरु होईल. पण स्विमिंग पुलाचे व्यवस्थापन महापालिकेनेच करावे म्हणजे महापालिकेनेच हा स्विमिंग पूल चालवावा. कोणत्याही खासगी संस्थेला स्विमिंग पूल चालवण्याचे मॅनेजमेंट देऊ नये. यात सर्वसामान्य जनतेला, सामान्य घरातील मुलांना पोहता यावे, पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे, यासाठी हा स्विमिंग पूल बांधला आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

स्केटिंग ट्रॅक तयार होणार

मीरा भाईंदर झपाट्याने वाढत असलेले शहर आहे. शहरात स्केटिंगची आवड असणारे, स्केटिंगचा सराव करू इच्छिणारे अनेक जण आहेत. त्यामुळे या स्विमिंग पूलाजवळील मोकळ्या जागेत ’स्केटिंग ट्रॅक’ तयार केला जाणार आहे. स्केटिंग ट्रॅक तयार करण्याचा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्यासाठी आमदार निधीतून आवश्यक तो निधी दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार निधीतून स्केटिंग ट्रॅक व इतर क्रीडाविषयक साहित्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा –

…त्यानंतरच मी ईडीच्या समोर जाणार, अखेर अनिल देशमुखांनी सोडलं मौन

First Published on: August 19, 2021 8:46 PM
Exit mobile version