अविश्वास ठरावाच्या भितीने उपसभापती ठाकरेंचा अखेर राजीनामा

अविश्वास ठरावाच्या भितीने उपसभापती ठाकरेंचा अखेर राजीनामा

वाडा : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या राजकारणाचे पडसाद स्थानिक पातळीवरील राजकारणावर होऊ लागल्याचे दिसत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या वाडा पंचायत समितीच्या उपसभापतींविरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या अविश्वास ठरावाच्या भितीने वाडा पंचायत समिती उपसभापती सागर ठाकरे यांनी पंचायत समिती सभापती रघुनाथ माळी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने वाडा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विराजमान असलेले अपक्ष सदस्य सागर ठाकरे हे शिंदेगटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर त्यांची अन्य सदस्यांसोबत समन्वय नसल्याने त्यांच्यावर विद्यमान सभापतींसह अन्य आठ सदस्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 72 पोटकलम ( 2) अन्वये पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे नुकतीच अविश्वासाच्या ठरावाची नोटीस बजावली आहे.

त्यामुळे विद्यमान उपसभापती ठाकरेंवर अविश्वास ठराव येण्याची चिन्हे होती. मात्र त्यांनी आता राजीनामा दिला आहे.
वाडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता आहे. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुनाथ माळी तर उपसभापतीपदावर शिवसेनेच्या कोट्यातून अपक्ष सदस्य सागर ठाकरेंना संधी देण्यात आली होती. मात्र ते आता शिंदेगटाच्या वाटेवर असल्याने त्यांच्यावर अविश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. ठाकरे यांनी समिती निवडणुकीत मोज गणातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले होते. त्यावेळी निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याचे फळ त्यांना उपसभापतीपदाच्या रुपाने मिळाले होते. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनीच अविश्वासाच्या ठरावाची नोटीस बजावल्याने सागर ठाकरेंचे पद धोक्यात आले होते.

First Published on: October 30, 2022 10:18 PM
Exit mobile version