पाणी आणि घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

पाणी आणि घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

वाडा : ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी मिटावा यासाठी जलजीवन मिशन आणि घरकुलांपासून कोणीही लाभार्थी वंचित राहू नयेत, यासाठी अमृत महाआवास अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन आमदार सुनिल भुसारा यांनी वाड्यातील कार्यशाळेत केले. वाडा पंचायत समितीने बुधवारी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत आमदार भुसारा आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी पाणीटंचाई आराखडा आणि घरकुल योजनेचा आढावा घेतला.
केंद्रसरकार आणि राज्यसरकारने जल जीवन मिशन आणि अमृत महाआवास अभियानाच्या माध्यमातून पाणी आणि घरकुल योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी पुरवठा तर मार्च २०२२ पर्यंत घरकुल योजनेचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी अमृत महा आवास अभियान हे शंभर दिवसांचे अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत आढावा घेण्यासाठी आमदार भुसारांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा या तालुकानिहाय आढावा बैठका घेतल्या. बुधवारी वाडा तालुक्याचा आढावा घेण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भुसारांनी वरील उद्गार काढले. गावाच्या विकासासाठी सरपंचांनी अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला सारून काम करावे असे आवाहन भुसारा यांनी नवनिर्वाचित सरपंचांना केले.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, वाडा पंचायत समितीच्या सभापती अस्मिता लहांगे, उपसभापती जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अक्षता चौधरी, भक्ती वलटे, मिताली बागूल, पंचायत समिती सदस्य रघुनाथ माळी, अमोल पाटील, योगेश गवा, सागर ठाकरे पुनम पथवा, दृष्टी मोकाशी, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ आदी उपस्थित होते.

First Published on: December 9, 2022 9:57 PM
Exit mobile version