बोईसरमध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण

बोईसरमध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण

सचिन पाटील,बोईसर : बोईसरमध्ये सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा सुरू आहे. या अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने तोडक कारवाई करून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच जागेवर भूमाफीयांकडून अतिक्रमण सुरू आहे. बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा डाव आखला जात आहे. मौजे दांडीपाडा येथील साईनगर परिसरातील सर्व्हे क्र.१२,७,२७/१ ते ६५/४६,२७/१ ते ६५/१/६५ वरील जवळपास ५ एकर सरकारी मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली अनधिकृत बांधकामे पालघर महसूल विभागाने मे महिन्यात तहसीलदार सुनील शिंदे,मंडळ अधिकारी मनीष वर्तक, तलाठी उज्वल्ला पाटील यांच्या उपस्थितीत तोडण्यात आली होती. मात्र या कारवाईला पाच महिने उलटत नाहीत, तोच पुन्हा या जागेवर तारेचे कुंपण करून जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.ही जागा बळकावून त्यावर पुन्हा अनधिकृत चाळी आणि गाळे बांधण्यासाठी जागेला तारेचे कुंपण टाकले जात आहे.

ही सरकारी जागा बळकावण्यासाठी भूमाफीयांना बोईसर ग्रामपंचायतीमधील विद्यमान पदाधिकारी यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे सरकारी जागेवर अवैध कब्जा करीत अनधिकृत इमारती,चाळी आणि गाळे फोफावत असताना ग्रामपंचायत महसूल आणि वन विभागाच्या सुस्त कारभारामुळे सरकारी जागा भूमाफियांच्या घशात सहज जात आहेत. बोईसर मंडळ अधिकारी आणि तलाठी सजा बोईसर यांच्या डोळ्यादेखत काटकर पाडा, गणेश नगर, राणीशिगाव रोड, दांडीपाडा, लोखंडी पाडा या परिसरात सरकारी आणि राखीव वन जमिनीवर अनधिकृत बांधकामे प्रचंड वाढल्याने परिसराला बकाल रूप आले आहे.

First Published on: December 28, 2022 9:21 PM
Exit mobile version