मेट्रो कारशेडच्या हरकतींवर सुनावणीला सुरुवात

मेट्रो कारशेडच्या हरकतींवर सुनावणीला सुरुवात

भाईंदर :- दहिसर ते भाईंदर मेट्रो ९ प्रकल्पाचे कारशेड भाईंदर पश्चिमेच्या राई, मुर्धा व मोर्वा या गावात उभारण्यात येणार आहे. हे कारशेड येथे उभारू नये तसेच यासाठी लागणारी जमीन विकास आराखड्यात आरक्षित करण्याविरोधात गावकर्‍यांनी हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतीवर मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात सुनावणी घेण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. ही सुनावणी ३० जानेवारीला सुरू होणार होती. परंतु ती ३१ जानेवारी पासून २ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तीन दिवस चालणार आहे.

भाईंदर पश्चिमेच्या राई , मुर्धा, मोर्वा या गावातील तब्बल ३२ हेक्टर जमिनीवर दहिसर – भाईंदर मेट्रो ९ व अंधेरी – दहिसर मेट्रो ७ अ प्रकल्पासाठी मेट्रो कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएने जागा आरक्षित केली आहे. ही जमीन विकास आराखड्यात देखील आरक्षित करण्याच्या दृष्टीने सहसंचालक कोकण विभाग यांनी सप्टेंबर महिन्यात हरकती सूचना मागवल्या होत्या . या जागेत कारशेड उभारल्यास शेत जमिनी बाधित होणार असल्याने त्याला विरोध करत जवळपास १२०० हरकती ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर येत्या ३१ जानेवारीपासून नवी मुंबई येथील सहसंचालक कोकण विभाग सुनावणी आयोजित केल्या जाणार होत्या. परंतु ही सुनावणी मीरा -भाईंदर शहरातच घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली होती. त्यानुसार ही सुनावणी मीरा -भाईंदर महापालिका मुख्यालयात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार होती. ती ३० ऐवजी ३१ जानेवारीला सुरू झाल्यामुळे २ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी या सुनावणीला जवळपास ३५० ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. या सुनावणीचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. सुनावणी कोकण विभागाचे सहसंचालक नगररचना अधिकारी जितेंद्र भोपळे हे घेत आहेत, तर मीरा भाईंदर महापालिकेचे सहायक संचालक हेमंत ठाकूर, नगररचनाकार केशव शिंदे हे उपस्थित होते.

 

सरकारने एकीकडे गोर गरिबांच्या जमिनीवर प्रस्तावित मेट्रो कारशेड होणार नाही असे सांगत आहे, तसेच आमदार सरनाईक यांच्या हिवाळी अधिवेशनातील लक्षवेधीला उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सांगितले आहे की मेट्रो कारशेड हे मुर्धा, राई व मोरवा गावातील भातशेतीच्या जमिनीवर होणार नाही पुढे उत्तनला होणार आहे. पण त्याबाबतचा शासन निर्णय व आदेश प्रत्यक्षात निघणार नाही तोपर्यंत हा ग्रामस्थांचा लढा चालूच असणार आहे.

– अशोक पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्था –

First Published on: January 31, 2023 8:36 PM
Exit mobile version