गुरांवर घटसर्पाची साथच; १३ जनावरे दगावली, लसीकरणासाठी कर्मचार्‍यांची कमतरता

गुरांवर घटसर्पाची साथच; १३ जनावरे दगावली, लसीकरणासाठी कर्मचार्‍यांची कमतरता

गुरांवर घटसर्पाची साथ

मोखाड्यातील खोडाळा विभागातील सायदे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत घटसर्प या साथीच्या आजारामुळे तब्बल १३ जनावरे दगावली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तब्बल १४ महत्वाची पदे रिक्त ठेवून गुरांना पर्यायाने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारने आता या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग असता तर वेळेवर लसीकरण आणि उपचार होऊन जनावरांचे प्राण वाचले असते, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. मोखाडा तालुक्यातील खोडाळा विभागातील हट्टीपाडा, सावरपाडा, हुंड्याचीवाडी या गावांतील गाय, बैल अशा तब्बल १३ जनावरांचा दोन ते तीन दिवसांतच मृत्यू झाला असून सर्व जनावरे मोठी आणि दुभत्या गायी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तसेच गुरांच्या मृत्युमुळे हळहळही व्यक्त होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गायी पाळणे आणि शेतीसाठी बैल पाळणे म्हणजे मोखाडा तालुक्यात गुन्हा झाला आहे का, असे शेतकरी बोलू लागले आहेत.

घटसर्प नावाच्या या साथीच्या आजारात गुरांना ताप येणे, गळ्याभोवती सुज येणे पोट फुगणे ही लक्षणे असून अगदी दोन दिवसातच यामुळे गुरांचा मृत्यू होतो. अशा साथीच्या आजारासाठी दरवर्षी आजाराआधीच लसीकरण होणेही गरजेचे असते. कारण हा आजार झाल्यानंतर यावरील उपचार तेवढा प्रभावी ठरत नाही. मात्र हे सगळे करण्यासाठी कर्मचारी तर हवेत ना. कारण मोखाडा पशु विभागात मंजूर २० पदांपैकी तब्बल १४ पदे रिक्त असून यामध्ये महत्त्वाच्या पशुधन विकास अधिकारी या पदाचाही समावेश आहे.

खोडाळा भागात नेहमीच गुरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असतो. मात्र कर्मचारी कमी असल्याची कारणे सांगून वेळ मारुन नेली जाते. आता तात्काळ लसीकरण सुरु करावे. तसेच या पशु मालकांना भरपाई द्यावी.
– दिलीप जागले, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुळात पशु विभागाचे दोन विभागा असून लाखो रुपये खर्च करून खोडाळा येथे पशु दवाखाना उभारला आहे. मात्र तिथे बसायला सरकारी अधिकारीच नाही. वन ग्रेड असलेल्या दवाखान्यातील पदे रिक्त आहेत. एका एका पशु पर्यवेक्षावर तीन ते चार विभागाचा अतिरिक्त कारभार देवून कसाबसा कारभार हाकलला जात आहे. यामुळे गुरांवर उपचार करणे, लसीकरण करणे ही कामे होवू शकत नसल्यामुळे मोखाड्यातील गुरांनाही आता वाली राहिलेला नाही. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे पालघरचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरून गुरांचे जीव वाचवावेत. तसेच मृत गुरांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. याबाबत पशु विभागाशी संपर्क साधला असता पदच रिक्त असल्याने याची जबाबदारी घेणार कोण, असा सवाल असून पर्यवेक्षकावरही तीन ते चार जागांचा अतिरिक्त भार आहे. तरीही याबाबतचे लसीकरण सुरू करू, असे एका पशु पर्यवेक्षकाने सांगितले.

(ज्ञानेश्वर पालवे – हे मोखाड्याचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

कोरोना संसर्ग वाढत असलेल्या राज्यांत चाचण्यांचा वेग वाढवा, केंद्राचे राज्यांना निर्देश

First Published on: January 18, 2022 8:33 PM
Exit mobile version