पालघरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीवर कर्मचारी ठाम, दुसर्‍या दिवशीही आंदोलन

पालघरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीवर कर्मचारी ठाम, दुसर्‍या दिवशीही आंदोलन

टीम महानगर, पालघर : मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखालील पुकारलेल्या बेमुदत संपाचा आजच्या दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील शिक्षक, ग्रामसेवक आरोग्य सेवक, जिल्हा परिषद मधील सर्व शासकीय कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. दुसर्‍या दिवशी तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचारी पंचायत समिती पालघरच्या आवारात एकत्र जमले होते. मोखाडा तालुक्यात या आंदोलनाने मोठे स्वरूप प्राप्त केले असून या आंदोलनात शिक्षक समन्वय समिती शंभर टक्के सामील झाल्याने अनेक शाळांना टाळे लागले आहे.तर वाडा तालुक्यातील कार्यालये ओस पडली असताना शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी निषेध नोंदवून कामकाज नियमित सुरू ठेवल्याच्या भूमिकेचे पालक वर्तुळातून स्वागत होत आहे.

डहाणू तालुक्यातील शिक्षक संघांनी बुधवारी डहाणू उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पंचायत समिती येथे निवेदन सदर करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत,अशी माहिती यावेळी देण्यात आली. मंगळवारी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी एकत्रित संप पुकारून जिल्हा परिषद समोर मोठे आंदोलन केले होते. आज दुसर्‍या दिवशी प्रत्येक तालुक्यातील कर्मचार्‍यांनी आपापल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गुरूवारी संपाचा तिसरा दिवस असून उद्यापासून मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होणार आहेत.

First Published on: March 15, 2023 10:00 PM
Exit mobile version