सरावली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरू

सरावली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरू

बोईसर: पालघर जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सर्वात श्रीमंत समजल्या जाणार्‍या सरावली ग्रामपंचायतीच्या फेब्रुवारी २०२३ ला होणार्‍या आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे.थेट सरपंच पद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने इच्छुकांची भली मोठी संख्या सरपंच पदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता आहे.यातच सरावली ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी काही जणांकडून ग्रामपंचायत बाहेरील आणि बोगस मतदार नोंदणीचे प्रकार होत असल्याचे आरोप होत आहेत. फेब्रुवारी २०१८ साली झालेल्या सरावली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने एक हाती सत्ता स्थापन केली होती.त्यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या लक्ष्मी चांदणे यांनी बाजी मारली होती. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणी करण्याची मोहीम सुरू असून यामध्ये शेजारील बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना देखील सरावलीत घुसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला

सरावली हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.शेजारील बोईसर ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असले तरी सरावलीमध्ये मात्र ग्रामपंचायत,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे.राज्यात शिवसेनेत फुट पडल्यानंतर प्रभाकर राऊळ आणि जगदीश धोडी हे सरावलीत राहणारे प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत.त्यामुळे आगामी निवडणुकीत ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

 

समस्या मार्गी लावण्याचे आव्हान

सरावली हा मूळगाव आणि कामगार वस्ती असा संमिश्र लोकवस्तीचा परिसर असून तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे या भागात गेल्या २० वर्षांपासून प्रचंड नागरीकरण झाले आहे.सततच्या वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते,पिण्याचे पाणी,घनकचरा व्यवस्थापन,स्वच्छता,गटारे,सांडपाणी,शिक्षण,आरोग्य,अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे अशा अनेक समस्या वाढत असून ६ कोटींचा वार्षिक आराखडा असलेल्या ग्रामपंचायतीसमोर परिसराचा सुनियोजीत विकास आणि समस्या मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे.

First Published on: November 29, 2022 10:03 PM
Exit mobile version