बेकायदा रविवार बाजाराला महापालिकेचा वरदहस्त

बेकायदा रविवार बाजाराला महापालिकेचा वरदहस्त

मीरा-भाईंदर महानगरपालिका (सौजन्य-लोकसत्ता)

ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्य्या वाढत असताना तसेच भाईंदर पश्चिम येथील मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रचंड वाहतुककोंडी होत असून देखील मिरा भाईंदर महापालिका मात्र बेकायदा भरणाऱ्या रविवार बाजारावर कारवाईला कमालीची टाळाटाळ करून फेरीवाले आणि बाजार वासुकी करणारे ठेकेदार यांचे उखळ पांढरे करण्याकरता धडपड करत आहेत. आधीच अरुंद रस्त्यावर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने सर्वसामान्य नागरिक त्रासले असताना एकही नगरसेवक चकार शब्द काढत नाहीत.

भाईंदर पश्चिमेला गावखेडे असताना भरत असलेल्या आठवडे बाजारात गेल्या काही वर्षात प्रचंड मोठ्या संख्येने फेरीवाल्यांची भर पडल्याने थेट शिवसेना गल्ली-नाकापर्यंत तसेच महापालिका मुख्यालयाच्या समोर व मागील बाजूस फोफावला आहे. या आठवडे बाजारात पूर्वी गावागावातून सुकी मासळी, भाजीपाला घेऊन येणाऱ्या महिलांपेक्षा आता फेरीवाल्यांचीच मुख्य रस्ता व पदपथावर अतिक्रमण करून दादागिरी चालत आहे. मुळात या फेरीवाल्यांवर कारवाईऐवजी महापालिका प्रशासन, नगरसेवक यांचाच अर्थपूर्ण वरदहस्त असल्याने ते सतत येऊन अतिक्रमण करतात.
बाजार वसुली करणारा ठेकेदार याचा बक्कळ कमाईचा हा रविवार बाजार असून ठेकेदाराचे लागेबांधे देखील कारवाई न करण्यामागचे मोठे कारण मानले जाते. दुसरीकडे स्वतः फेरीवालेच बाजार वसुली ठेकेदार हा अवास्तव पैसे घेऊन बसायला सांगतो, असा प्रकार स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणला आहे.

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे भाईंदर पोलीस ठाण्यापासून शिवसेना गल्ली-नाकापर्यंतचा मुख्य रस्ता जाम होत आहे. वास्तविक रस्ता हा भाईंदर रेल्वे स्थानकापासून थेट उत्तन-गोराईपर्यंत जाणारा असून या मुख्य मार्गावरुन एसटी, एमबीएमटी आदी सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते.

परंतू अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतुककोंडी होत असल्याने आपात्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहनसुद्धा जाऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. कधी तर अर्धा-अर्धा तास वाहतूक ठप्प होते. लांबच लांब रांगा लागतात व नागरिक अडकून पडतात. पोलीस ठाणे, पालिका कार्यालय, महापालिका बस स्थानकांना सुद्धा फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे. त्यातच रविवार बाजार भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला-मुलींची छेड काढणाऱ्या रोड-रोमियोंमुळे जाचक ठरत आहे. बाजार आटोपल्यावर फेरीवाले, भाजीवाले कचरा तसाच टाकून जातात. बंदी असलेल्या प्लस्टिक पिशव्यांचा वापर होतो. साफ-सफाईचा भुर्दंड महापालिकेलाच सोसावा लागतो. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असताना फेरीवाले व येणारे ग्राहक बहुतांशी मास्क न घालताच गर्दीत सहभागी होतात. याचे देखील गांभीर्य महापालिका व नगरसेवकांना राहिलेले नाही.

याआधी महासभेत मुख्यालयापर्यंत भाजी व सुकी मासळी विक्रेत्या महिलांनाच बसू द्यावे, असे ठरले होते. परंतू फेरीवाले सर्रास बस्तान मांडून बसताना दिसतात. फेरीवाला पथक प्रमुखानेच राजेश हॉटेलपर्यंत फेरीवाल्यांना बसू द्यावे म्हणून सांगितल्याचे महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे महापालिकेचे कर्मचारी वाहनासह उभे असताना देखील थेट शिवसेना गल्ली नाक्यापर्यंत फेरीवाले महापालिकेच्या नाकावर टिच्चून बसलेले असतात.

हेही वाचा –

Coronavirus: राज्यात पुन्हा निर्बंधाबाबतचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होणार; राजेश टोपेंचे संकेत

First Published on: December 29, 2021 3:14 PM
Exit mobile version