महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला भीषण आग

महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला भीषण आग

विरार: नालासोपारा पूर्वेतील धानीवबाग येथे वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. नालासोपारा पूर्वेला धानीवबाग परिसर आहे. या परिसरातून वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची सीएनजी बस दुपारी साडेतीनच्या सुमारास महामार्गाकडे जात असताना बसला अचानक आग लागली. गाडीच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमधे यावेळी जवळपास १५ प्रवाशी असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. सदर घटनेची माहिती वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळताच जवान घटनास्थळी दाखल होऊन आग विझविली आहे. या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी संपूर्ण बस मात्र जळून खाक झाली आहे. बसला आग का लागली, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

First Published on: September 30, 2022 9:43 PM
Exit mobile version