पालघर जिल्ह्यात २७ जानेवारीपासून ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

पालघर जिल्ह्यात २७ जानेवारीपासून ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा होणार, विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न

पालघरसह वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व माध्यमांच्या ८ वी ते १२ वी च्या शाळा गुरुवार, २७ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा या कोविडच्या परिस्थितीनुरूप नंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांनी दिला आहे.

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात जिल्हा परिषद अंतर्गत १२० शाळा, वरिष्ठ महाविद्यालय ४, कनिष्ठ महाविद्यालय ३६, दिव्यांग शाळा ७, खासगी शाळा ७५२ कार्यरत आहेत. वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रात एकूण शालेय विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ९४ हजार २८९ इतकी असून त्यापैकी १ ली ते ७ वी मध्ये २ लाख ६४ हजार ३५२ इतके विद्यार्थी आहेत. तर ८ वी ते १२ वी मध्ये १ लाख २९ हजार ९३७ इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शासन निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या पहिल्या डोसचे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मनपा कार्यक्षेत्रात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या एकूण ७६ हजार ८२६ इतकी आहे. त्यापैकी ५८ हजार ७५८ लाभार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असून त्याची टक्केवारी ७६.०६ टक्के इतकी आहे.

शाळा सुरू करण्याबाबतच्या शालेय शिक्षण विभागाचे नियमावलीच्या अंमलबजावणी अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांमध्ये तपासणी करता पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. या पथकामध्ये शिक्षण विभाग, मनपा वैद्यकीय आरोग्य विभाग, सहाय्यक आयुक्त स्तरावरील कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची आवश्यकतेनुसार व चाचण्याही करण्यात येणार आहेत.

First Published on: January 22, 2022 6:00 AM
Exit mobile version